Loksabha 2019 : अडवानींनी भाजपला दाखविला आरसा

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 एप्रिल 2019

- लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर अडवानींनी ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केली नाराजी.

नवी दिल्ली : एखाद्याशी राजकीय मतभेद असले म्हणून तो आपला हाडवैरी असत नाही व राष्ट्रविरोधी असा शिक्का येता-जाता कोणावरही मारता कामा नये, अशी भावना व्यक्त करीत भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी यांनी नरेंद्र मोदीप्रणीत भाजपला आज आरसा दाखविला. लोकसभा रणांगणातून बाजूला केल्यावर अडवानींनी ""राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर व "मी' सर्वांत शेवटी,'' या ब्लॉगद्वारे आपल्या भावना अत्यंत सूचकपणे मांडल्या आहेत.

नरेंद्र मोदी या नावातील "न' देखील न उच्चारता अडवानींनी भाजपच्या वर्तमान नेतृत्वाच्या एकाधिकारशाही कार्यपद्धतीला अपरोक्ष चांगलेच फटकारे दिले आहेत. 1991 पासून त्यांना सतत निवडून देणाऱ्या गांधीनगरच्या मतदारांचे आभार मानायलाही अडवानी विसरलेले नाहीत. 

अडवानींनी 2009 च्या पराभवानंतर लोकसभेत बोलतानाही, "भिन्न मते असलेल्यांबद्दलची सहिष्णुता व आदरभाव हा लोकशाहीचा आत्मा होय,' असे स्पष्ट सांगितले होते. 2014 नंतरच्या मोदीकाळात त्यांच्या बोलण्यावर अघोषित बंदीच आणलेली होती. मात्र, आता भाजपने त्यांचे लोकसभा तिकीटही कापल्यावर भाजपच्या या भीष्माचार्यांनी ब्लॉग लिहून मन मोकळे केले आहे. 

अडवानी म्हणतात, की भारतीय लोकशाहीतील विविधता व परस्परांबद्दलचा आदरभाव हा प्राणवायू आहे. भाजपने आपल्या स्थापनेपासून हीच मूल्ये पाळण्याचा कटाक्ष ठेवला. भाजपपेक्षा वेगळी राजकीय विचारसरणी असणाऱ्यांना या पक्षाने (म्हणजे अटल-अडवानींच्या भाजपने) केव्हाही शत्रू म्हणून व्यवहार केला नाही. त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रवादाची आमची संकल्पना अशी आहे, की जे आमच्यासह नाहीत त्यांना कधीही देशविरोधी ठरविलेले नाही.

देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या व्यक्तिगत-राजकीय मतमतांतरांचे निवड स्वातंत्र्य देण्याबाबत भाजप कायम ठामपणे उभा राहिला. पक्षात व राष्ट्रीय पातळीवरील दृष्टिकोनातून लोकशाहीचे व लोकशाही परंपरांचे रक्षण करण्यास भाजपने कायम सर्वोच्च प्राधान्य दिले. 

मातृभूमीची सेवा हाच ध्यास

भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था व पारदर्शकता आणण्यासाठी आवश्‍यक त्या निवडणूक सुधारणा करण्यासही भाजपने कायम प्राधान्य दिल्याचेही अडवानी म्हणतात. सहा एप्रिल या भाजपच्या स्थापना दिनाचा सोहळा पक्ष सत्तेत असताना साजरा करताना अडवानींनी म्हटले आहे, की या पक्षाचा एक संस्थापक म्हणून माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना व माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनाही माझ्या भावनांबरोबर विदीत करणे हे माझे कर्तव्य आहे. मातृभूमीची सेवा हा माझा वयाच्या 14व्या वर्षापासूनचा ध्यास बनला व आजही तो तेवढ्याच जाज्वल्य निष्ठेने कायम आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LK Advani express Nervousness with Blog after denies candidacy from BJP