कारणराजकारण : विकास गावांसाठी हरवलेलाच 

शनिवार, 13 एप्रिल 2019

पुणे जिल्ह्यातील गावागावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने "सकाळ' सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्‍नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे. 

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चाकणच्या चमचमत्या औद्योगिक वसाहतीपासून अवघ्या पाच किलोमीटवर भामचंद्र डोंगररांगांत वसलेली गावं, वाड्या अस्वस्थ आहेत. समोर विकास पसरलेला दिसतोय आणि गावात तो शोधून सापडत नाही, याची अस्वस्थता आहे. शिवसेनेचा पारंपरिक मतदार जरूर दुखावला आहे; मात्र पर्याय पाहावा तर प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पत्ताही नाही, अशी परिस्थिती डोंगररांगांमध्ये आहे. 

आंभू ते करंजविहिरे अंतर आहे वीस किलोमीटर. प्रवासाला लागतात दोन तास. रस्ते नावालाच उरलेत. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळं चार महिन्यांपूर्वी आंभूमधील गर्भवतीचं बाळंतपण ऍम्ब्युलन्समध्येच करावं लागल्याचं ग्रामस्थ संतापून सांगतात. 
शिवे, देशमुखवाडी, वाहगाव, गडद, आसखेड आदी गावांची मिळून दहा हजारांवर लोकवस्ती आहे. मतदार सात हजारांवर आहेत. रस्ते, पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. जिल्ह्यातल्या अन्य ग्रामीण भागाप्रमाणंच इथंही औद्योगिक वसाहतीत नोकऱ्यांसाठी आवश्‍यक ती कौशल्ये नाहीत. ती शिकण्याची व्यवस्थाही नाही. परिणामी, मिळतात त्या फुटकळ नोकऱ्या. त्यामुळं शेतीवरचं अवलंबित्व कमी होत नाही. या चक्रातून सुटकेसाठी राजकीय नेतृत्वाकडं मतदार अपेक्षेनं पाहताहेत. 

चाकण-मंचर रस्ता चौपदरी आहे; मात्र इथं अपघाताची समस्या निर्माण झालीय. मंचरला घोडेगाव फाट्यावरून लांडेवाडीकडं जाताना तीन वेळचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं निवासस्थान जवळ आल्याच्या खुणा दिसतात. भामचंद्र डोंगराच्या गावांसारखे खड्ड्यात रस्ते इथं नाहीयेत. आढळरावांच्या निवासस्थानी केलेल्या विकासकामांचे आणि प्रस्तावित योजनांचे अहवाल हातात ठेवूनच इथं कार्यकर्ते बोलतात. 

घोडेगावात कांदा, इतर शेतीमाल आणि विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. इथं शिवसेना आढळरावांच्या कामाबद्दल तर भाजप थेट सर्जिकल स्ट्राइकवर प्रचाराचा नूर नेते आहे. हवेली, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्‍यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस दिसतेय. ईर्षा उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये अधिक आहे. 

जुन्नरमध्ये शिवनेरीच्या सर्वांगीण विकासाची हमी देणाऱ्याला स्पष्ट मतदान करायचं आहे. तुकड्या तुकड्यांमध्ये होत असलेला शिवजन्मस्थळाचा विकास कार्यकर्त्यांना डाचतो आहे. बनकर फाटा, येणेरे, डिंगोरे, उदापूर, ओतूर आदी भागांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ग्लॅमरवर आणि आढळरावांना चौथ्यांदा कशासाठी संधी द्यावी, या मुद्द्यावर प्रचारात आहेत. आळेफाट्यासारख्या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न आहे. त्यावर आढळरावांनी काही केले नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. आढळरावांचे समर्थक बैलगाडा शर्यतींसाठी त्यांनी केलेलं काम आवर्जून सांगत राहतात. 

मुख्य रस्त्यांपासून आत असणाऱ्या गावांमध्ये कोणता उमेदवार पोचतोय, हा मतदारसंघातला कळीचा मुद्दा आहे. येत्या दोन आठवड्यात अधिकाधिक गावांमध्ये दाखल होणाऱ्या उमेदवाराला सर्वाधिक संधी राहील, असं एकूण चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 development work in Shirur constituency