LokSabha 2019 : महाजनांची ‘मात्रा’ लोकसभेला लागू पडेल?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

जोश लाटेवर स्वार होईल का?
प्रत्येक निवडणूक वेगळी आणि तिचे वैशिष्ट्यही स्ततंत्र असते. २०१४ मध्ये मोदी लाटेचा भाजपला फायदा झाला. पण, राज्य व केंद्रात त्यावेळी आणि राज्यात तर त्याआधीची पंधरा वर्षे काँग्रेस आघाडीचे सरकार होते. अशा स्थितीत पक्षातील कार्यकर्त्यांमधील जोश ‘हाय’ ठेवण्यात खडसेंना यश आले होते. आता २०१४ सारखी लाट नाही..

मे २०१४ ते एप्रिल २०१९ या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही ‘सुजय’सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक विभागातील आठही जागा भाजप-शिवसेना युतीनं काबीज केल्या. आता स्थिती बदललीय. मोदी लाट ओसरलीय, खडसेंची जागा पक्षानं गिरीश महाजनांना देऊ केलीय. त्यांनी या आठ जागांचं आव्हान स्वीकारलंय. त्यामुळे पालिका निवडणुकीतील व्यवस्थापनाची महाजनांची ‘मात्रा’ लोकसभेला कशी लागू पडते, ते आता पाहायचेय.

कोणत्याही एका किंवा अनेक निवडणुकांचे मापदंड दुसऱ्या निवडणुकीसाठी लागू पडू शकत नाही. भारतासारख्या मोठ्या लोकशाहीप्रधान देशात तर प्रत्येक निवडणूक ही त्या-त्या वेळी वेगळी असते, तिची वैशिष्ट्ये आणि आयामही निराळे असतात.. त्यामुळे भूतकाळातील निवडणुकीतील कामगिरीचे प्रगती पुस्तक दाखवून पुढच्या निवडणुकीतील विजय आपोआप गळ्यात पडत नसतो, त्यासाठी स्वतंत्र नियोजन, व्यवस्थापन आणि परिश्रम करावेच लागतात. 

२०१४ मधील निवडणूक भाजपने मोदी लाटेवर स्वार होऊन लढली.. महाराष्ट्रात लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूक भाजपने जिंकली. उत्तर महाराष्ट्राने या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपच्या तराजूत झुकते माप दिले. खानदेश, उत्तर महाराष्ट्रात खडसेंनी नेतृत्वासह जिवाचे रान करत ‘शत-प्रतिशत’ यश मिळविले.. त्यावेळीही सुजय विखे-पाटलांसारखे प्रयोग झाले.. खानदेशात डॉक्‍टरद्वयी हीना गावित व सुभाष भामरे ही बोलकी उदाहरणे.. अगदी विधानसभा निवडणुकीतही अनिल गोटे, जळगाव जिल्ह्यातून संजय सावकारे.. अन्य नावेही घेता येतील.. बेरजेच्या याच राजकीय प्रयोगातून भाजपने राज्यही काबीज केले.. अर्थात, त्यातही खडसेंची भूमिका महत्त्वाची व निर्णायक ठरली. 

मात्र, गेल्या पाच वर्षांत उत्तर महाराष्ट्रातील, विशेषत: खानदेशातील राजकीय स्थिती खूपच बदलली. तीन वर्षांपूर्वी खडसेंना मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले आणि तापी-गोदाकाठच्या या क्षेत्राचे राजकीय समीकरणच बदलले. या क्षेत्राची सूत्रे मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक गिरीश महाजनांकडे सोपविली, त्यांनीही वेळोवेळी दिलेल्या जबाबदारीप्रसंगी नेतृत्व सिद्ध केले. 

खडसे, महाजन या दोघांची कार्यशैली वेगळी आहे. खडसेंचा स्वभाव आक्रमक, विरोधकांना अंगावर घेत त्यांनी पक्षविस्तार तर केलाच, शिवाय राज्याच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले. अगदी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. तर विरोधकांचे ‘सेटिंग’ करत यश मिळविण्यात कुणी हात धरू शकणार नाही, अशी महाजनांची ख्याती. या अनोख्या व्यवस्थापनातून त्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये ‘सक्‍सेस’ मिळविला. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचा धुराळा बऱ्यापैकी उडायला लागलेला असताना उत्तर महाराष्ट्रात या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. पक्षावर नाराज खडसे त्यात किती ‘रस’ घेतात, हे पाहतानाच महाजनांच्या पालिका निवडणुकांतील यशाची ‘मात्रा’ लोकसभेसाठी कितपत लागू पडते, हे पाहावे लागेल.

जोश लाटेवर स्वार होईल का?
प्रत्येक निवडणूक वेगळी आणि तिचे वैशिष्ट्यही स्ततंत्र असते. २०१४ मध्ये मोदी लाटेचा भाजपला फायदा झाला. पण, राज्य व केंद्रात त्यावेळी आणि राज्यात तर त्याआधीची पंधरा वर्षे काँग्रेस आघाडीचे सरकार होते. अशा स्थितीत पक्षातील कार्यकर्त्यांमधील जोश ‘हाय’ ठेवण्यात खडसेंना यश आले होते. आता २०१४ सारखी लाट नाही.. पाच वर्षांपासून केंद्र व राज्यात, अगदी महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे.. महाजनांमागे सरकारचे ‘सर्व’ प्रकारचे पाठबळ आहे.. पण कार्यकर्त्यांतील त्यावेळचा ‘हाय’ जोश ‘लो’ झालेला दिसतोय, हे वेगळे सांगायला नको.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LokSabha 2019 Every election is different and its feature is still free