Loksabha 2019 : कर्नाटकाच्या राजकारणावर बंगारप्पांची आजही छाप

संजय उपाध्ये
सोमवार, 15 एप्रिल 2019

कारकीर्दीवर एक नजर

 •  १९६२ पासून ५० वर्षे राजकीय जीवनात
 •  सोरबमधून विधानसभेवर सलग ७ वेळा आमदार
 •  सन १९९०-१९९२ या काळात कर्नाटकाचे १२ वे मुख्यमंत्री
 •  १९९६ ला शिमोग्यातून खासदार (कर्नाटक काँग्रेस पक्ष)
 •  १९९९ ला शिमोग्यातून विजयी (काँग्रेस पक्ष)
 •  २००४ ला शिमोग्यातून लोकसभेवर (भारतीय जनता पक्ष)
 •  २००५ ला पोटनिवडणुकीत विजयी (समाजवादी पक्ष)

कर्नाटकातील सोरब विधानसभा मतदारसंघातून सात वेळा आमदार. शिमोग्यातून चार वेळा विविध पक्षांकडून खासदार. एकदा मुख्यमंत्री. ५० वर्षांच्या राजकारणात काँग्रेसला तीन वेळा सोडचिठ्ठी. तीन स्वतंत्र पक्षांची स्थापना. पुन्हा स्वगृही परत. त्याबरोबरच ऐतिहासिक ठरावेत असे तीन पराभवही. हा आहे, कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस. बंगारप्पा यांचा राजकीय बायोडाटा. आजही कर्नाटकच्या राजकारणावर त्यांची छाप आहे.

कर्नाटकात शिमोगा हा बंगारप्पा यांचा जिल्हा. कर्मभूमीही तीच. जिल्ह्याने राज्याला कडिदाळ मंजाप्पा, एस. बंगारप्पा, जे. एच. पटेल, बी. एस. येडियुराप्पा असे चार मुख्यमंत्री दिले. सध्या बंगारप्पा यांचे पुत्र आणि धजदचे उमेदवार मधु बंगारप्पा हे शिमोग्यातून लोकसभेसाठी भाजपचे बी. वाय. राघवेंद्र यांच्याशी टक्कर देत आहेत. त्यामुळे शिमोगा मतदारसंघ आणि बंगारप्पा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

संपूर्ण कर्नाटकात केवळ दोन टक्के इतकेच मतदान असलेल्या इडिग या समाजातून येऊन राज्यातील जवळपास सर्व पदे बंगारप्पा यांनी भूषविली. १९६२ ला त्यांनी कार्यकर्ता म्हणून समाजवादी पक्षापासून राजकारणात प्रवेश केला. १९६७ ला त्यांनी सोरब या घरच्या मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेत प्रवेश केला.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर १९८३ ला त्यांनी कर्नाटक क्रांती रंगा या पक्षाची स्थापन केली. या पक्षाच्याच पाठिंब्यावर कर्नाटकात जनता पक्षाचे पहिले काँग्रेसेत्तर सरकार आले आणि रामकृष्ण हेगडे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले. काँग्रेसने वीराप्पा मोईली यांना मुख्यमंत्री पदावर बसविल्यानंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडून कर्नाटक काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

बंगारप्पांनी १९९६ ला पहिल्यांदा शिमोग्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. मात्र १९९८ ला भाजपच्या आयनूर मंजुनाथ यांच्याकडून त्यांचा पहिल्यांदाच ऐतिहासिक पराभव झाला. मे २००८ मध्ये त्यांना शिकारीपुरात बी. एस. येडियुराप्पा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. तर मे २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत येडियुराप्पा यांचे पुत्र राघवेंद्र यांच्याकडूनही मात खावी लागली. त्यानंतर देवगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दलात त्यांनी प्रवेश केला.

कारकीर्दीवर एक नजर

 •  १९६२ पासून ५० वर्षे राजकीय जीवनात
 •  सोरबमधून विधानसभेवर सलग ७ वेळा आमदार
 •  सन १९९०-१९९२ या काळात कर्नाटकाचे १२ वे मुख्यमंत्री
 •  १९९६ ला शिमोग्यातून खासदार (कर्नाटक काँग्रेस पक्ष)
 •  १९९९ ला शिमोग्यातून विजयी (काँग्रेस पक्ष)
 •  २००४ ला शिमोग्यातून लोकसभेवर (भारतीय जनता पक्ष)
 •  २००५ ला पोटनिवडणुकीत विजयी (समाजवादी पक्ष)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 influence of S. Bangarappa on Karnataka