अंदाजपंचे: नांदेडचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार; तर परभणी, हिंगोलीत 'हे' जिंकतील

रविवार, 19 मे 2019

- नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचाच विजय
- हिंगोलीत शिवसेनेच्या हेमंत पाटलांची बाजी
- परभणीत राष्ट्रवादीची टीकटीक, विटेकर होतील विजयी

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

नांदेडचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार...
नांदेड लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात काट्याची लढाई झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपने संपूर्ण प्रकारची रसद चिखलीकरांच्या मागे उभी केल्याने अशोकरावांना नांदेडमध्येच जखडून राहावे लागले. त्यातच नरेंद्र मोदी स्वत: मुख्यमंत्र्यांच्या तीन सभांनी वातावरणही फिरवून टाकले. तसेत वंचित आघाडीच्या प्रा. यशपाल भिंगे यांनी दलित, मुस्लिम व धनगर समाजात मोठा प्रभाव निर्माण केल्याने काँग्रेसच्या मतांत मोठी घट होणार आहे, जी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत अशोक चव्हाणांनी त्यांचे स्वत:चे विशिष्ट नेटवर्क क्रियाशील केले. फंडे राबविले. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्यातील पहिलीच सभा नांदेडात झाली व तिचा फायदा तरूण मतदारांच्या रूपाने चव्हाण यांना होईल, अशी शक्यता व्यक्त होत अाहे. चव्हाण यांच्या ताब्यात असलेली नांदेड मनपा, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, तीन आमदार या ग्रासरूट मधील नेटवर्कच्या बळावर चव्हाणांनी शेवटचा जोर मारला आहे. या सर्व गोष्टींचा जोरावर नांदेड लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अशोकराव चव्हाण हेच बाजी मारणार हे निश्चित आहे.

हिंगोलीतून शिवसेनेच्या हेमंत पाटलांची बाजी
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या विजयाचे गणित मांडले जात आहे. मोदी लाटेमधे विजयी झालेले काँग्रेसचे खासदार ऍड. राजीव सातव यांच्यावर गुजरात राज्याची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांनी निवडणुक लढविण्यास नकार दिला होता. त्यामुळे काँग्रेस कडून कोण उमेदवार द्यावा असा प्रश्न निर्माण झाला. पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला अन  लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आगोदर काँग्रेस मधे प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यांच्या पक्षबदलाचा फटका त्यांना बसणार आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेसचे मतदान वंचितकडे गेल्यामुळे त्याचा शिवसेनेचे हेमंत पाटील यांना फायदा होईल असे बोलले जात आहे.

परभणीत राष्ट्रवादीचे विटेकर मारणार बाजी
परभणी लोकसभा मतदार संघात यावेळी बदल घडू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मतदानापूर्वी शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. त्याच बरोबर राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या बाजूने मराठा समाज एकवटाला होता. परंतू मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या आसपास असलेल्या ओबीसी समाजासह अन्य छोट्या मोठ्या समाजाचा कल काही अंशी शिवसेनेकडे झुकलेला दिसला. यात मोदी फॅक्टरचे प्रमाण मोठे होते. त्याच बरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्या पाठीमागे दलित समाज एकजुटीने उभा राहिल्याचे दिसले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसची एक व्होट बॅक यावेळी फुटली. तर मुस्लिम समाजाने पूर्णपणे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बाजूने मतदान केल्याचे दिसले. एकंदर या गुंतागुंतीच्या वातावरणात परभणी लोकसभेचा आगामी खासादार कोण ? हा अंदाज बांधणे म्हणावे तितके शक्य नाही. पंरतू शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस या दोन्ही पक्षाच्यावतीने आमचाच उमेदवार निवडुन येणार असल्याचा दावा केला जात असला तरी, परभणी मतदारसंघात बदल निश्चित आहे. म्हणूनच या मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजेश विटेकर विजयी होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loksabha 2019 result prediction in Nanded Parbhani and Hingoli losksabha constituency