Loksabha 2019 : मोदी, शहा हेच लक्ष्य - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी समाचार घेईनच; मात्र, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘साम’चे संपादक नीलेश खरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांना दिलेल्या मुलाखतीत केली. या निवडणुकीत मोदी व शहा हेच लक्ष्य असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी समाचार घेईनच; मात्र, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘साम’चे संपादक नीलेश खरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांना दिलेल्या मुलाखतीत केली. या निवडणुकीत मोदी व शहा हेच लक्ष्य असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

प्रश्‍न - प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्या संदर्भात धक्‍कादायक वक्‍तव्य केले आहे, यावर आपली प्रतिक्रिया काय?
राज -
 यावर भाजपवाल्याचे काय म्हणणे आहे? हा खरा मुद्दा आहे. मोदी आणि शहा माझे लक्ष्य आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. करकरे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झाले. त्यांना अशोकचक्र मिळाले आहे. अशा व्यक्‍तीबद्दल भाजपचा लोकसभेसाठीचा उमेदवार बोलतो की, ‘माझ्या शापाने त्यांचा मृत्यू झाला,’ यांना थोडीही लाज वाटत नाही. नुसते करकरेच नाही गेले. साळसकर, ओंबाळे, कामटे गेले. प्रज्ञासिंह म्हणतात की, पोलिस कोठडीत वाईट वागणूक देत अत्याचार केले. बाँबस्फोटाचे प्रकरण होते ना. मग पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करणार, दुर्दैवाने पंतप्रधान त्याचे समर्थन करतात.
 
दहशतवादाबद्दल बोलताना काश्‍मीरचा मुद्दा पुढे येतो. मोदी सरकारने काश्‍मीरचा प्रश्‍न कसा हाताळला?
मी पहिल्यांदा काश्‍मिरला गेलो होतो, तेव्हा शिकाऱ्यातून फेरफटका मारून परत आलो. त्या वेळी तेथील लोक म्हणाले, ‘साब, आपके जुबान में वजन है ।’ आप महाराष्ट्र में जाएँगे तो अपील करो.. कश्‍मीर आ जाए, वरना हम भूखे मर जाएँगे.’ तिथल्या लोकांना रोजगार हवा आहे. हेच मोदी मेहबूबा मुफ्तीबरोबर सत्तेत होते ना. अचानक पाठिंबा काढला अन्‌ राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर पुलवामातील घटना घडली. मग सांगता गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. हल्ल्याबाबत यंत्रणांनी इशारा दिला होता. सरकारने उपाययोजना केल्या नाहीत. ‘आरडीएक्‍स’ आले कुठून? 

 ते लगेच देशद्रोही ठरवतात...
हे कोण आले देशद्रोही ठरवणारे! त्यांचा संबंध काय आहे. ते काय सर्टिफिकेट वाटणार का देशाला! ज्या पाकिस्तानने आमचे इतके जवान मारले. पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला केक भरवताना लाज वाटली नाही? 

पंतप्रधान म्हणाले, आम्ही अणुबाँब दिवाळीसाठी ठेवलेत का?
मुळात पंतप्रधान देशातील प्रश्‍नांविषयी चकार शब्द काढत नाहीत. स्मार्ट शहरे, डिजिटल इंडिया आदींचे काय झाले, हे सांगत नाहीत. आरबीआयचा राखीव निधी खर्च करण्यासाठी मागता. तुमच्याकडे पैसेच नाहीत तर युद्ध कसे करणार?

मोदी-शहांच्या विरोधात कुणी बोलत असेल तर, त्यांना तपास यंत्रणांची भीती दाखवण्यात येते अशी चर्चा आहे, तुम्हाला अशी भीती वाटत नाही?
कसली भीती? या देशात स्पष्ट बोलायला कशाला हवी भीती? मी कुणालाही घाबरत नाही. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादली असताना पु. ल. देशपांडे यांच्यासह अनेक साहित्यिक रस्त्यावर उतरले होते; मग आज आपल्यातील साहित्यिक कुठे गेले?, ते बोलत का नाहीत?

भाजपच्या विरोधात तुम्ही सुपारी घेतल्याचा आरोप केला जातोय...
माझ्या कात्रीत कुणी सुपारी देण्याचा प्रयत्न करू नये. मी तिचा भुसा करून टाकेन. खोट्याच्या विरोधात मी बोलतच राहणार.
 
मोदी-शहांवर टीका करण्याऐवजी राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालवावा, असे बोलले जातेय.
मी पक्ष कसा चालवतो हे माझ्या पक्षाच्या नेत्यांना विचारा. उलट तुमच्या पक्षात काय चालले आहे ते बघा. तुम्ही अडवणींना तिकीट दिले की नाही याचे मला देणे घेणे नाही. पक्ष कसाही चालवा, मात्र सरकार चालवताना एक व्यवस्था असते, त्यातच निर्णय घेणे अपेक्षित आहे. नोटाबंदी करताना मोदींनी काय केले?. आरबीआय, मंत्रिमंडळाला न विचारता हा माणूस नोटाबंदीचा निर्णय कसा घेऊ शकतो? यामुळे आरबीआयचे दोन्ही गव्हर्नर राजीनामे देतात, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकशाही धोक्‍यात आल्याचे सांगतात, हे पूर्वी कधी घडले होते का? अशा पद्धतीचा कारभार खपवून घेणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Amit Shah Saam TV Raj Thackeray Politics