Loksabha 2019 : मनोज तिवारी म्हणजे फक्त चांगला नाच्या : केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 5 मे 2019

दिल्लीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना नाचणारा किंवा नाच्या, असे म्हणून हिणवल्याने त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना नाचणारा किंवा नाच्या, असे म्हणून हिणवल्याने त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. भाजपने अखेरच्या आठवड्यात या भाषेचा पुरेपूर वापर करण्याचे ठरविले आहेच; पण तिवारी यांनीही याला प्रादेशिकतेचा रंग देऊन, आपल्यावर टीका म्हणजे साऱ्या पूर्वांचली-बिहारींवर टीका, असे वक्तव्य केले आहे. 

दिल्लीत येत्या 12 मे रोजी मतदान आहे. सध्या येथील सातच्या सात जागा भाजपकडे आहेत. यंदा या सातपैकी गौतम गंभीर उमेदवार असलेल्या पूर्व दिल्लीबरोबरच ईशान्य दिल्लीच्या जागेचीही मोठी चर्चा आहे. येथे तिवारी विरुद्ध शीला दीक्षित यांच्यात मुख्य लढत आहे. "आप'चे दिलीप पांडे अद्याप शर्यतीतही नसल्याचे वातावरण आहे. त्यामुळेच केजरीवाल यांनी त्यांच्यासाठी रोड शो केला व त्यातून हा वाद उद्‌भवला. येथे तब्बल 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांनी केजरीवाल यांच्या दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा, या आश्‍वासनातील फोलपणा लक्षात आणून दिला आहे.

भाजपनेही याची खिल्ली उडविली आहे. मात्र, भाजपने निवडणुकीच्या तोंडावर "आप'ला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याने पक्ष खवळला आहे. केजरीवाल यांनी तिवारींच्या मतदरारसंघातील एका जाहीर सभेत "तिवारी तर केवळ नाचणारे म्हणजे नाच्या आहेत. ते केवळ नाचू शकतात,' असा हल्लाबोल केला. तिवारी यांनी याला प्रत्युत्तर देताना हा समस्त पूर्वांचली नागरिकांचा अपमान आहे व लोक आता केजरीवालांना याचा परिणाम भोगायला लावतील, असे प्रत्युत्तर दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manoj Tiwari is Dancer says Arvind Kejriwal