Loksabha 2019 : अंतिम टप्प्यात पेटणार प्रचाराचे रान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदानाला अवघे पाच दिवस उरले आहेत. त्यापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहापर्यंत प्रचार संपवावा लागणार आहे. यामुळे प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात वेग घेतला आहे.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदानाला अवघे पाच दिवस उरले आहेत. त्यापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहापर्यंत प्रचार संपवावा लागणार आहे. यामुळे प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात वेग घेतला आहे. तळागाळातील मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उन्हातान्हाचा वा रात्रीचा विचार न करता आटापिटा सुरू आहे. याचीच प्रचिती मंगळवारी (ता. २३) शहरात फेरफटका मारल्यानंतर आली. 

कोपरा सभा, बैठका, पदयात्रा
महाआघाडीची प्रचार यंत्रणा ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांपासून गल्लीतील कार्यकर्त्यांपर्यंत पोचली आहे. प्रचाराचे नियोजन वार्डस्तरावर केले आहे. काळभोरनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, जगदीश शेट्टी यांच्यासह पंधरा-वीस कार्यकर्ते कोपरा सभा व बैठकींचे नियोजन करीत होते. पिंपळे निलख येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बुधवारी सभा होणार आहे. काँग्रेसचे एक हजार कार्यकर्ते सभेला असतील, असे शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या प्रचार प्रमुखांना कळविले होते. प्रचाररथ उभा होता. वॉर्डस्तरावर सुरू असलेल्या कोपरा सभा, कार्यकर्त्यांची बैठकी यांची माहिती घेऊन वॉर्ड, बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना सूचना केल्या जात होत्या. राष्ट्रवादीसह सहयोगी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, रिपब्लिकन पक्षाचे गवई व कवाडे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपासून मतदारांना ‘स्लिपा’ वाटायला सुरवात केली आहे. 

भेटीगाठी, प्रचारफेरी, सभा
महायुतीच्या प्रचारार्थ सोमवारी पिंपरी कॅम्प परिसरातून प्रचार फेरी काढली. आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. रिव्हर रोड येथील आंबेडकर कॉलनीतून सुरवात झाली. 

बौद्धनगर, भाटनगर, मेन बाजार, शगून चौक, साई चौक, जायका चौक, जयहिंद चौक, अशोक थिएटर परिसर, डिलक्‍स रोड, रिव्हर रोड, सुभाषनगरमधील मतदारांशी संपर्क साधला. कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. शहरात प्रचार रथाद्वारे केंद्र सरकारची भूमिका मतदारापर्यंत पोचविली जात होती. तसेच, चिंचवड विधानसभा क्षेत्रात कोपरा सभा झाल्या. थेरगावातील सभेला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे खासदारांचे मोठे संख्याबळ आवश्‍यक आहे. त्यांच्या मागे उभा राहणाऱ्या खासदारांत आपल्यातील एक खासदार उभा असला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maval Lok Sabha constituency final phase of the campaign