Loksabha 2019 : लष्कर ही मोदींची मालमत्ता नाही : राहुल गांधी

पीटीआय
शनिवार, 4 मे 2019

भारतीय लष्कराची कामगिरी देदीप्यमान आहे. मोदींचा या कामगिरीशी काय संबंध? त्यांनी याचे श्रेय का घ्यावे? त्यांनी युवकांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगावे. यंदा भाजप पराभूत होणार, हे निश्‍चित आहे. 

- राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाला उत्तर देताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. भारतीय लष्कर ही मोदींची खासगी मालमत्ता नसून, उलट भाजप दहशतवादाशी लढताना तडजोडी करीत आहे, असा आरोप राहुल यांनी केला. त्यासाठी राहुल यांनी वाजपेयींच्या काळात मसूद अजहरला सोडून दिल्याचा दाखला दिला.

राहुल गांधी यांनी आज पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेत भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. "दहशतवाद ही अत्यंत मोठी समस्या असून, कॉंग्रेस पक्षच याबाबत अधिक कडक भूमिका घेऊ शकतो. भाजप मात्र मतांच्या राजकारणासाठी संरक्षण दलांचा वापर करीत आहे. "एनडीए'च्या पहिल्या सत्ताकाळातच मसूदला सोडून देण्यात आले होते. भाजपने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली आहे. "यूपीए'च्या काळातील सर्जिकल स्ट्राइकला व्हिडिओ गेम असे हिणवून मोदींनी लष्कराचा अवमान केला आहे,' अशी टीका राहुल यांनी केली. 

पंतप्रधान मोदींनी काल (ता. 3) कॉंग्रेसवर टीका करताना "यूपीए'चे सर्जिकल स्ट्राइक्‍स कागदावरच असल्याचे म्हणत सर्जिकल स्ट्राइक म्हणजे व्हिडिओ गेम असल्यासारखे कॉंग्रेस नेत्यांना वाटत असल्याचे म्हटले होते. त्याला राहुल यांनी आज उत्तर दिले. "मसूदला पाकिस्तानात परत कोणी पाठविले?दहशतवाद्यांबरोबर चर्चा कोणी केली? त्यांच्यासमोर कोण झुकले? भाजपने दहशतवाद्यांबरोबर तडजोड केली. कॉंग्रेसने असे कधीही केले नाही,' असा दावा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Military is not Property of Narendra Modi says Rahul Gandhi