Loksabha 2019 : लढाई संपली, कर्म तुमची वाट बघताहेत! : राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मे 2019

- आता लढाई संपली

- माझ्या वडिलांवर केलेले आरोपही तुम्हाला वाचवू शकत नाही

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधींना "भ्रष्टाचारी नं. 1' ठरविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. संतप्त राहुल गांधींनी मोदींवर जोरदार हल्ला चढवताना "तुमची कर्म वाट बघत आहेत,' असा इशारा मोदींना दिला. तर, "मोदींनी सत्य सांगितल्यामुळे भडकलेल्या कॉंग्रेसने अपशब्द बोलणे सुरू केले आहे. 23 मेस कॉंग्रेसची कर्म दिसतील', असा उलटवार भाजपने केला. 

पंतप्रधान मोदींनी एका प्रचार सभेदरम्यान कॉंग्रेसवर टीका करताना म्हटले होते, की राजीव गांधींना कॉंग्रेसने "मि. क्‍लिन' ठरवले. मि. क्‍लिन यांचा अंत पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हणून झाला. मोदींच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधींनी पुढे सरसावत मोदींवर तोफ डागली. 

"आता पंतप्रधान मोदींची लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट बघत आहेत. तुमचे स्वतःबद्दलचे विचार माझ्या पित्यावर लादूनही तुम्ही वाचू शकणार नाहीत. सप्रेम अलिंगन,'' असे ट्विट राहुल गांधी यांनी मोदींना उद्देशून केले. 

पाठोपाठ प्रियांका गांधींनीही ट्विटच्या माध्यमातून मोदींना लक्ष्य केले. "हुतात्म्यांच्या नावावर मते मागून त्यांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱ्या मोदींनी काल आपल्या बेताल वक्तव्याने एका सच्च्या आणि पवित्र व्यक्तीच्या हौतात्म्याचा अनादर केला. ज्यांच्यासाठी राजीव गांधींनी प्राण वेचले, ती अमेठीची जनता याचे उत्तर देईल. मोदीजी हा देश कधीही विश्‍वासघात करणाऱ्यांना क्षमा करत नाही,'' असे प्रियांकांनी म्हटले. यासोबतच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, कॉंग्रसचे माध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते पवन खेडा यांनीही मोदींवर कडाडून टीका केली. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन मोदींची पाठराखण करताना कॉंग्रेस नेत्यांना धारेवर धरले.

"मोदींनी सांगितलेले सत्य आहे. 1984 च्या शीख विरोधी दंगलीला राजीव गांधींनी उघड पाठिंबा दिला नव्हता काय? भोपाळमध्ये 30 हजार लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या वायूगळतीला जबाबदार ऍन्डरसनला सरकारी विमानातून भोपाळमधून दिल्लीस आणून देशाबाहेर जाण्यासाठी राजीव गांधींनी मदत केली नव्हती काय?,''

अशा प्रश्‍नांची फैर झाडताना जावडेकर म्हणाले, "शाहबानो प्रकरणात राजीव गांधींनी जातीयवादी राजकारण केले. बोफोर्स प्रकरणातील दलाल कात्रोचीचे गांधी कुटुंबीयांशी संबंध होते. त्याच्या खात्यात जमा झालेले पैसे नंतर इतर तीन खात्यांमध्ये गेले. त्याचा माग का नाही काढण्यात आला?, तत्कालीन परराष्ट्रमंत्री माधवसिंग सोळंकी यांना स्वीडनच्या पंतप्रधानांनी पाठविलेल्या पत्राची दखल का नाही घेतली?'' 

मोदींना हिटलर, मौत का सौदागर म्हणणाऱ्यांची घराणेशाहीची मानसिकता आहे. मोदींनी सत्य सांगितल्यानंतर बिथरलेल्या कॉंग्रेसने शेवटच्या टप्प्यात अपशब्दांची चिखलफेक सुरू केली, हे निषेधार्ह आहे. 
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modiji Your Karma awaits you says Rahul Gandhi