Loksabha 2019 : मतदानाच्या पूर्वसंध्येला गडचिरोलीत माओवाद्यांकडून स्फोट; सीआरपीएफचा जवान जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव दलाचा एक जवान जखमी झाला.

एटापल्ली (गडचिरोली) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव दलाचा एक जवान जखमी झाला. ही घटना गट्टा पोलिस मदत केंद्रापासून 200 मीटर अंतरावरील आठवडी बाजारात बुधवारी (ता. 10) सायंकाळी घडली.

सुनील पटले असे जखमी जवानाचे नाव आहे. गट्टा पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर वटेली गावाच्या मतदार केंद्राच्या ईव्हीएमसह केंद्र अधिकारी व कर्मचारी पोलिस सुरक्षेत जात असताना आठवडी बाजारात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा जवान अमित पटेल जखमी झाला. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नक्षल विरोधी शोधमोहीम तीव्र केली आहे. 

बहिष्काराचे बॅनर सापडले 
जांबिया गावाजवळील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी सहा ठिकाणी बॅनर बांधून "खोट्या संसदीय लोकसभा निवडणुकीचा बहिष्कार करा' असे मतदारांना आव्हान केले. गट्टा, गर्देवाडा व इतर मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असून या भागात प्रचारादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार व कार्यकर्ता फिरकला नाही. त्यामुळे मतदार नागरिकांना निवडणुकीची फारशी माहिती नसून लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष व आघाडीचा उमेदवार तसेच एकूण किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत याची कोणतीही कल्पना नाही. बॅनरवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी असा उल्लेख आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moist blast in Gadchiroli CRPF soldier injured