Loksabha 2019 : महामिलावट म्हणजे जात-पात जपना, जनता का माल अपना : मोदी

पीटीआय
रविवार, 28 एप्रिल 2019

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष, बसप आणि कॉंग्रेसच्या महामिलावट आघाडीचा एकच मंत्र आहे, तो म्हणजे जात पात अपना, जनता का माल अपना', अशा शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीवर टीका केली.

कनौज : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष, बसप आणि कॉंग्रेसच्या महामिलावट आघाडीचा एकच मंत्र आहे, तो म्हणजे जात पात अपना, जनता का माल अपना', अशा शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीवर टीका केली. 

उत्तर प्रदेशात कनौज येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले, महामिलावट आघाडीचा व्यवसायच मुळात भ्रष्टाचार करण्याचा असून त्यासाठी त्यांना दिल्लीतही हतबल सरकार हवे आहे. मनासारखे सरकार आले की त्यांना मनमानीपणे लूटमार करता येईल. 2014 पूर्वी ते हेच करायचे. मात्र देशात तीन टप्प्यांतील मतदान झाले असून, निम्म्या देशाने या महामिलावट आघाडीचा स्वप्नभंग केला आहे. 2014 रोजीचा विक्रम याही वेळेस मोडला जाईल, असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला.

महाआघाडीच्या नेत्यांनी चौकीदाराला शिव्या घातल्या, रामभक्तांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली, मात्र त्याचा परिणाम उलट झाला, की हेच लोक संपले, असे ते म्हणाले. आजघडीला ज्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून मदत मिळाली असे शेतकरी मोदींचा प्रचार करत आहेत. देशाचे संरक्षण करणाऱ्या ज्या जवानास बुलेटप्रूफ जॅकेट आणि शस्त्र मिळाली अशा जवानाचे पालक मोदींचा प्रचार करत आहेत. दहशतवाद्यांपासून देशाचे संरक्षण व्हायला पाहिजे.

सप-बसपाची मंडळींनी दहशतवादाबद्धल अवाक्षरही काढत नाहीत. मोदींना एवढ्या शिव्या घातल्या, मात्र दहशतवाद्यांना कोणीच काही बोलले नाही. सप-बसपचे लोक दहशतवाद्यांना घाबरतात का? का त्यांना वाचवण्यासाठी गप्प बसले आहेत, असा सवाल मोदींनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi Criticizes on Congress and Alliance