Loksabha 2019 : 'मोदी औरंगजेबाचा आधुनिक अवतार'

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मे 2019

- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औरंगजेबाचा आधुनिक अवतार

- जे काम औरंगजेब पूर्ण करू शकला नाही, ते मोदी करीत आहेत

वाराणसी : "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहेत. जे काम औरंगजेब पूर्ण करू शकला नाही, ते मोदी करीत आहेत,'' अशी कडवी टीका कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे. निवडणूक प्रचारासाठी निरुपम वाराणसीत आहेत.

प्रचारादरम्यान त्यांनी मोदींच्या धोरणांवर सडकून टीका केली. वाराणसीतील मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतशी विरोधकांकडून मोदींवर टीकेची धार वाढत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधींनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली होती. आता संजय निरुपम यांनी त्यांच्यावर थेट "औरंगजेबाचा आधुनिक अवतार' अशी टीका केली. "मुघल बादशाह औरंगजेबाने वाराणसीवर हल्ला केला होता. वाराणसीतील अनेक मंदिरे त्याने पाडली. काशीच्या नागरिकांवर त्याने "जिझीया' कर बसविला होता,'' असे निरुपम यांनी म्हटले आहे. 

"मोदी हे औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहेत. कॉरिडॉरच्या नावाखाली त्यांनी काशीतील शेकडो मंदिरे पाडली. अमरनाथ दर्शनासाठी 550 रुपयांचे शुल्क आकारले जाते. औरंगजेब जेव्हा काशीची मंदिरे तोडायला आला होता तेव्हा येथील लोकांनी त्याला मंदिरे पाडू दिली नव्हती. पण, आता हिंदूहिताच्या गोष्टी करणारे मोदी त्याची कसर पूर्ण करीत आहेत. त्याला जे करता आले नाही ते मोदी करीत आहेत,'' अशी टीका निरुपम यांनी केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi is Modern Avatar of Aurangzeb