ModiWithSakal : बालाकोटमध्ये काही झालेच नाही असे दाखवणे पाकिस्तानची चलाखी : मोदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत.

प्रश्‍न : पाकिस्तानात बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ला केला. तिथे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांना नेऊन काहीच घडले नाही असे दाखवले, याबद्दल तुम्हाला काय वाटते?

उत्तर : सर्जिकल स्ट्राइक झाला तेव्हा पाकमध्ये २५० किमीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी आपल्या तुकड्या गेल्या. कोणाला पाच तास लागले, कोणाला दोन तास. मात्र हल्ला एकाच वेळी होईल असा समन्वय ठेवला होता. त्यानंतर २४ तासांत पाकिस्ताननं माध्यमांना नेऊन दाखवलं की कुठे काही घडलंच नाही. हे करता आले, कारण २५० किमीमध्ये अशा अनेक मोकळ्या जागा होत्या जिथे काहीच घडले नाही, ते त्यांच्यासाठी सोयीचे होते. बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर मात्र ४३ दिवस पाकिस्ताननं तिथं कोणाला जाऊ दिले नाही. पत्रकारांनाही प्रवेश दिला नाही. मात्र तिथल्या नागरिकांच्या मुलाखती झाल्या त्यातून हल्ला झाला हे स्पष्ट होतं आणि हल्ला झाला हे तर पाकिस्ताननंच जाहीर केलं. आम्ही सकाळी सांगणार होतो, पाकिस्ताननं पहाटेच जाहीर केलं, की कोणीतरी आलं आणि आम्हाला मारून गेलं. आता ४३ दिवसांत त्यांनी एकतर तिथं संपूर्ण साफसफाई केली असेल, नवं बांधकाम केलं असेल किंवा कोणत्या तरी नव्याच जागेवर माध्यमांना नेलं असेल, कारण तिथल्या डोंगरांमध्ये तेवढी एकच आस्थापना होती. सर्जिकल स्ट्राइकवेळी २५० किमीमध्ये काही झालं नाही असं दाखवणं ही त्यांची चलाखी होती आता ते जे करत आहेत ते भारतातील निवडणुका ध्यानात घेऊन सुरू आहे. निवडणुकांमध्ये अडथळे आणण्याचा खेळ पाकिस्तान करू इच्छितो. त्यासाठी हे सुरू आहे.

प्रश्‍न : बालाकोटमध्ये हल्ला झाला तिथे दहशतवादी प्रशिक्षणासाठी ६०० ते ७०० जण असायचे असे सांगितले जाते. म्हणून ३०० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आपण केला हे बरोबर आहे का?
उत्तर : आपण पाहिलं असेल एका अमेरिकन पत्रकारानं एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यात पाकिस्तानच्या लष्कराचे अधिकारी नागरिकांचे सांत्वन करताना दिसतात. जो गेला त्याला स्वर्ग मिळेल, हा तर जिहाद आहे असे सांगताना दिसतात. मुलांना कवटाळून रडतात. यातून स्पष्ट होतं किती जण मारले गेले असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi opens up about Balakot airstrike in an exclusive interview with Abhijit Pawar