ModiWithSakal : कर्जबुडव्यांना सोडणार नाही : मोदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. 

प्रश्न : तुमच्या सरकारच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करणारे अनेक गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले, असा आरोप विरोधकांकडून होतो. आपण काय सांगाल?

उत्तर : एक म्हणजे आमचं सरकार नसतं तर अशा कोणत्याही चोर-लुटेऱ्याला पळून जावं लागलं नसतं. सरकार बदललं तर ते आनंदानं परत यायला तयारही होतील. कारण पैशाचं एक चक्र होतं. काँग्रेसमध्ये फोन बॅंकिंग चालायचं. आम्ही ते सगळं बंद केलं आणि म्हणून त्यांना पळून जावं लागलं. पण त्यांना वाटत होतं की पळून गेलो तर आपण वाचू शकू, पण आम्ही कायदा बदलला. आज जगात कुठेही त्यांची मालमत्ता जप्त करता येते. या जितक्‍या पळपुट्या लोकांची चर्चा होते आहे, त्यांची मालमत्ता आम्ही जप्त केली आहे. आणि कायद्यानं अशी परिस्थिती निर्माण केली आहे, की त्यांना तिथेही तुरुंगात राहावं लागतं आहे. असं या आधी होत नव्हतं. पळून गेलेल्या लोकांची चर्चा होते आहे, पण आम्ही मिशेलला परत आणलं. ज्यांना आम्ही परत आणलं त्याचीही कोणीतरी चर्चा करायला हवी. जर तीन जणांना परत आणलं आहे तर तेराही येतील.

प्रश्न : उद्योग किंवा व्यवसायात कोणी बॅंकेकडून कर्ज घेतले आणि खरोखरच काही अडचणींमुळे कंपनी बंद पडली तर असे एक वातावरण निर्माण होते, की उद्योजकांना कर्जच देऊ नये. अशा परिस्थितीत बॅंकेच्या अधिकाऱ्यांनाही कर्जे देण्याची भीती वाटते. अमेरिकेत जसा चॅप्टर ११ आहे. उद्योजक पुन्हा उभा राहू शकतो, असे काही वातावरण निर्माण करण्याचे आपल्या मनात आहे का?

उत्तर : याविषयी रिझर्व्ह बॅंकेनं काही चांगल्या सूचना केल्या आहेत. पण आम्ही ही कठोर पावलं उचलल्यानं बॅंकांचे तीन लाख कोटी रुपये परत आले आहेत. म्हणजे पैसे परत देण्याची त्यांची क्षमता होती. आणि हे जे हात वर करणारे लोक असतात ते विमानात बिझनेस क्‍लासमधून प्रवास करतात, दर सहा महिन्यांनी नव्या नव्या गाड्या घेतात, त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल होत नाही. जनतेचे पैसे लुटले जातात ना. अशा लोकांच्या बाबतीत आम्ही कधीच नरमाईचे धोरण स्वीकारणार नाही, कोणालाच सोडणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi opens up about their government in an exclusive interview with Abhijit Pawar