Loksabha 2019 : ...तर ममता, मायावती किंवा चंद्राबाबू पंतप्रधान : शरद पवार

वृत्तसंस्था
Sunday, 28 April 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणे अतिशय कठीण आहे. एनडीए बहुमत मिळवण्यास अपयशी ठरले, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटत आहेत.

नवी दिल्ली : या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले नाही, तर ममता बॅनर्जी, मायावती किंवा चंद्राबाबू नायडू यांच्यापैकी एकजण पंतप्रधान होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवार एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केले आहे. पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, काँग्रेसनेही पंतप्रधान हा काँग्रेसचाच असेल असे म्हटले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी तर राहुल गांधीच आगामी पंतप्रधान असतील, असा दावा केला आहे.

शरद पवार यांनी या मुलाखतीत म्हटले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणे अतिशय कठीण आहे. एनडीए बहुमत मिळवण्यास अपयशी ठरले, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमत्री होते. त्यांनी राज्याच्या राजकारणात केलेली कामगिरी पाहूनच त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला 2014 मध्ये लोकांनी बहुमत दिले. असेच काहीसे एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास घडू शकते. कारण दीर्घकालीन मुख्यमंत्रिपदाचा अनुभव गाठीशी असलेले चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे तीन पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय मला सध्या दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार नाहीत असे मी म्हणत नाही. मायावती, ममता आणि नायडू हे मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहिलेले उमेदवार आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी ते देखील योग्य पर्याय ठरू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar talked about next prime minister of India