Loksabha 2019 : नितीन गडकरी यांना व्यासपीठावर भोवळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

- नितीन गडकरी यांचा रक्तदाब कमी झाल्याने आज अचानक आली भोवळ.

राहाता : भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत भाषण करीत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रक्तदाब कमी झाल्याने आज अचानक भोवळ आली. जवळ असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना तत्काळ आधार दिला. घशाला कोरड पडल्याने त्यांनी साखरमिश्रित लिंबू-पाणी पिऊन चॉकलेट खाल्ले. हुशारी आल्याने ते पाचच मिनिटांत पुन्हा उभे राहिले. श्रोत्यांना हात उंचावून अभिवादन करीत त्यांनी व्यासपीठ सोडले आणि साईदर्शनासाठी ते शिर्डीकडे रवाना झाले. 

गडकरी यांचे दुपारी चारच्या सुमारास शिर्डी विमानतळावर आगमन झाले. तेथून मोटारीने ते राहाता पालिकेसमोर आयोजित केलेल्या प्रचार सभेसाठी दाखल झाले. त्या वेळी त्यांना कमालीचा थकवा जाणवत होता. घशाला कोरड पडत होती. भाषणासाठी उठण्यापूर्वीच त्यांनी दोन वेळा लिंबू-साखरपाणी प्राशन केले. 

भाषण करीत असताना, मागणी केल्याने गडकरींना पुन्हा लिंबू-साखरपाणी देण्यात आले. भाषण सुरू असताना त्यांना भोवळ येऊ लागली. समयसूचकता दाखवत त्यांनी भाषण लगेचच आटोपते घेतले. मात्र, त्यांचा तोल जाऊ लागल्याने सुरक्षारक्षकाने त्यांना तातडीने आधार दिला. थोडे पाणी प्यायल्यानंतर गडकरींना हुशारी आली. ते उठून उभे राहिले, श्रोत्यांना हात उंचावून अभिवादन केले आणि ते शिर्डीकडे रवाना झाले. 

दर्शनानंतर गडकरी शिर्डी विमानतळावर दाखल झाले. तेथे डॉ. संदीप बनसोडे व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी त्यांचा रक्तदाब तपासला. तो 66 पर्यंत खाली आल्याचे निष्पन्न झाले. थोडा वेळ आराम केल्यानंतर गडकरी नागपूरकडे रवाना झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari Suffers Bout Dizziness Faints Down Stag in Nagar