Loksabha 2019 : देशात बदलाची लाट : सचिन पायलट 

पीटीआय
Monday, 6 May 2019

देशात सर्वत्र बदलाची लाट आहे. अशा स्थितीत भावनिक मुद्दे मांडून मतदारांत फूट पाडण्याच्या भाजपच्या आगळिकीने कोणताही लाभ मिळणार नाही.

नवी दिल्ली : देशात सर्वत्र बदलाची लाट आहे. अशा स्थितीत भावनिक मुद्दे मांडून मतदारांत फूट पाडण्याच्या भाजपच्या आगळिकीने कोणताही लाभ मिळणार नाही. येत्या 23 मे रोजी यूपीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्‍वास राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी व्यक्त केला. 

पायलट म्हणाले, ""ही निवडणूक विकासाच्या आणि मोदी सरकारने केलेल्या विश्‍वासघाताच्या मुद्द्यावर लढली जात आहे. त्यामुळे मंदिर- मशीद, अली-बजरंगबली किंवा राष्ट्रवाद हे मुद्दे पुन्हा उकरून काढणे हे लोकांच्या पचनी पडताना दिसून येत नाही. 2014चा मोदी फॅक्‍टर यंदा कोठेच दिसून येत नाही. कारण जनतेने गेल्या पाच वर्षांतील अकार्यक्षमता पाहिली आहे आणि ती त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हिंदी पट्ट्यात कॉंग्रेसला दमदार पाठिंबा मिळत आहे, कारण त्याठिकाणी भाजपच्या विकासाचा पर्दाफाश झाला आहे. जमावाकडून होणारे मॉब लिचिंग आणि गोरक्षण हे शब्द पाच वर्षांच्या अगोदर कोणाला ठावूकही नव्हते. ज्याप्रमाणे गेल्या पाच वर्षांत हिंसाचार, कटुतेचे विष पाहिले, ते स्वीकारण्याजोगे नाही.

भाजपचे नेते आपले अपयश झाकण्यासाठी कोणत्याही थराला जात असून मतदारांची दिशाभूल करण्यासाठी भावनिक मुद्दे उकरून काढले जात आहेत, असे पायलट म्हणाले. 23 मे रोजी जेव्हा लोकसभेचे निकाल लागतील, तेव्हा देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असेल आणि नवीन पंतप्रधान देशाला मिळेल, अशी आशा पायलट यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now wave of Change in country says Sachin Pilot