Loksabha 2019 : 'न्याय' योजना मोदींमुळेच सुचली : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

- मोदींची 15 लाखांची कल्पना चांगली.

- काँग्रेसने आता 'न्याय' योजना आणली.

चंद्रपूर/वर्धा : नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याची घोषणा केली. ती चांगली कल्पना होती; पण ती "थाप' निघाली. त्यांच्याच कल्पनेवरून कॉंग्रेसच्या "थिंक टॅंक'ने देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाकाठी 72 हजार रुपये देण्याची "न्याय' योजना तयार केली आहे. मात्र, ही "थाप' नाही. अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आम्ही हा विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांनी शुक्रवारी चंद्रपूर व वर्धा येथे सभा घेतली. 

"न्याय' योजनेंतर्गत पाच वर्षांत तीन लाख 60 हजार रुपये मिळतील. कोणत्याही व्यक्तीची मिळकत 12 हजारांपेक्षा कमी असेल, अशा प्रत्येक घटकाला या योजनेचा फायदा मिळेल. हे पैसे महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्यात जातील. मोदींनी मूठभर कोट्यधीशांना अब्जावधी रुपयांचे कर्ज माफ केले. आम्ही गरिबांना पैसे देऊ, असे ते म्हणाले. "मै प्रधानमंत्री नही, चौकीदार बनना चाहता हू' असे मोदी म्हणाले होते. मात्र, कोणत्या गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या घरी चौकीदार असतो? हे श्रीमंतांचे चौकीदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

राहुल गांधी म्हणाले...

- मोदींनी वर्ध्यातील सभेत रोजगाराविषयी चकार शब्द काढला नाही. 
- 22 लाख सरकारी पदे रिक्त आहेत, ती निश्‍चितपणे भरू. 
- पंचायतींमध्ये 10 लाख रोजगार निर्माण करू. 
- महिलांना विधानसभा, लोकसभा, राज्यसभेत 33 टक्के आरक्षण देऊ. 

मोदींनी अडवानींचा अपमान केला! 

हिंदू धर्मात सर्वांत मोठे नाते गुरू-शिष्यांचे असते. लालकृष्ण अडवानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरू आहेत. शिष्य गुरूंसमोर हात जोडतात; पण मोदी आपल्या गुरूला साधा नमस्कार करीत नाहीत, हे मी बघितले आहे. त्यांनी तर अडवानींना अपमानास्पदरीत्या मंचावरून खाली उतरविले, अशी टीका राहुल गांधींनी केली. हिंदू धर्मात द्वेष, धर्मांधता, सूड उगविणे हे कुठे लिहिले आहे? आमचे संस्कार प्रेमाचे आहेत, सुडाचे नाहीत. कॉंग्रेस सर्व समाजांना जोडण्याचे काम करते, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NYAY Sceme Introduced Because of Narendra Modi says Rahul Gandhi