Loksabha 2019 : मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारासाठी अवघे 60 तास 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

पिंपरी - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला अवघे 60 तास उरले आहेत. त्यामुळे महायुती व महाआघाडीसह अन्य उमेदवारांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेत्यांच्या जाहीर सभा, कोपरा सभा, बैठका, भेटीगाठी, पदयात्रा यावर सर्वच पक्षांचा भर आहे. सर्वांसाठी एक-एक मिनीट महत्त्वाचा असून, नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही प्रचाराचे काउंटडाऊन सुरू केले आहे. 

पिंपरी - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला अवघे 60 तास उरले आहेत. त्यामुळे महायुती व महाआघाडीसह अन्य उमेदवारांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेत्यांच्या जाहीर सभा, कोपरा सभा, बैठका, भेटीगाठी, पदयात्रा यावर सर्वच पक्षांचा भर आहे. सर्वांसाठी एक-एक मिनीट महत्त्वाचा असून, नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही प्रचाराचे काउंटडाऊन सुरू केले आहे. 

पुणे जिल्ह्यातील पुणे शहर व बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी (ता. 23) मतदान झाले. उरलेल्या शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. 29) मतदान आहे. आचारसंहितेनुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदर प्रचार थांबवावा लागतो. त्यानुसार शनिवारी (ता. 27) सायंकाळी सहा वाजता प्रचार थांबवावा लागणार आहे. यामुळे उरलेल्या 60 तासांतील प्रचाराचे गणित सर्वच नेत्यांनी मांडले आहे. महाआघाडीतर्फे अनुक्रमे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि महायुतीतर्फे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली आहे. यामुळे पवार कुटुंबासह शिवसेना आणि केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याकरिता भारतीय जनता पक्षासाठी हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेचे आहेत. त्यादृष्टीने प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याची धडपड नेत्यांनी सुरू केली आहे. त्याची झलक बुधवारी शहरात दिसून आली. 

महाआघाडी लगबग 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सकाळी वाकड, पिंपळे निलखमध्ये प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधला. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या गावात पिंपळे निलखमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सभा झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भोसरीत सभा घेऊन प्रचार केला. राष्ट्रवादीसह मित्र पक्षांच्या आजी-माजी नगरसेवकांनी व वॉर्डस्तरीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात पदयात्रा काढून प्रचार पत्रके वाटली. 

महायुतीची धडपड 
महायुतीतील शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर व मावळचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी पक्षातील सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मोरवाडीत बैठक घेतली. शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांची दापोडीत सभा झाली. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पिंपरी चौकात "आदित्य संवाद' कार्यक्रमातून मतदारांशी संवाद साधला. बोपखेल, दापोडी, कासारवाडी, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागांत कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढून प्रचार केला. 

आज होणाऱ्या सभा 
महाआघाडीतर्फे गुरुवारी (ता. 25) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या काळेवाडीत सभा होणार आहेत. तर, महायुतीतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपनेत्या नीलम गोऱ्हे यांची काळेवाडी फाटा येथील मैदानात जाहीर सभा होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 60 hours for election campaign in Maval and Shirur Lok Sabha constituencies