Loksabha 2019 : विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली : मोदी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

पहिल्या दोन टप्प्यांनंतर माझ्याविरोधात विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. जनतेला आता पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

नाशिक : पहिल्या दोन टप्प्यांनंतर माझ्याविरोधात विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. जनतेला आता पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (सोमवार) सभा झाली. दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, गिरीश महाजन आदी नेते उपस्थित होते.

मोदी म्हणाले, की सर्व नाशिकवासियांना नमस्कार, नाशिकच्या पवित्र भूमीत मला सामावून घेतले. नाशिक सप्तरंग, तीर्थक्षेत्र या पावन भूमीत मी धन्य झालो. नाशिकच्या पुण्यभूमीला मी अभिवादन करतो. आज जगभरात भारताचे स्थान खूप उंचीवर पोहचले आहे. भारताविरोधात कोणी वाकड्या नजरेने बघू शकत नाही. आपण आता डोळ्यात डोळू घालून समोरच्याशी बोलतो. आपल्या एका मतामुळे मी आतापर्यंत हे करू शकलो आहे. देश एक नवी ताकद म्हणून पुढे आला आहे. भारताच्या बाजूच्या देशांमध्ये स्फोट असताना भारताकडे कोणाचीही नजर जात नाही. 2014 पूर्वी आघाडी सरकारच्या काळात भारतात सारखे स्फोट होत होते. पण, आता तसे होत नाही. आपण, दहशतवाद्यांच्या ठिकाणांमध्ये घुसून हल्ला केला आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांना माहिती आहे, की इथे मोदी आहे आणि आपल्याला शिक्षा करेल.

आयुष्मान योजनेमुळे अनेकांना फायदा झाला आहे. गावागावांत रस्ते, वीज पोचविण्याचे काम होत आहे. भारतमाला, उडान योजनांमुळे मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकास पोचविण्याचे प्रयत्न आम्ही केले आहेत. आदिवासी क्षेत्रात खेळासंबंधी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरवात केली आहे. 23 मे रोजी निकाल येतील तेव्हा फिर एक बार, मोदी सरकार आले पाहिजे. नागरिकांना फसवून काँग्रेस मते मागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi criticizes Oppositions at Nashik