Loksabha 2019 : काशी मोदीमय; मोदी भक्तिमय

मंगेश वैशंपायन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

'मोदी मोदी'च्या गजरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघालेल्या रोड शोने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. 

वाराणसी : सदतीस अंश सेल्सिअसचे रणरणते ऊन. कार्यकर्ते घामाघूम झालेले, प्रत्येक जण आपल्या लाडक्‍या खासदाराच्या दर्शनासाठी आतुर झालेला. काशीसह उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे रस्ते अक्षरशः गजबजून गेले होते. 'भोलेनाथ भोलेनाथ'च्या आणि "मोदी मोदी'च्या गजरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघालेल्या रोड शोने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. 
 
भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठिकठिकाणी होणारा गुलाब पाकळ्यांचा वर्षाव आणि वाराणसीच्या अरुंद रस्त्यांवर गर्दीचा महापूर, यामुळे शहरातील वाहतूक भलेही कोलमडली असेल; पण भाजपची शक्ती व मोदींची भक्ती यांचा संगम येथे पाहायला मिळाला.
 
सुमारे सात किलोमीटरच्या या रोड शोची सुरवात संथ झाली व नंतर वेगाने ती पूर्ण करावी लागली. कारण, दशाश्‍वमेध घाटावर मोदींनी नंतर महाआरतीही केली. पंडित मदनमोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोदींनी रोड शो सुरू केला. जेथून रोड शो गेला त्या त्या ठिकाणी पाकळ्यांचा वर्षाव व मंत्रोच्चाराचा ध्वनी ऐकू येत होता. मोदींबरोबर रोड शोत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांचे जवळपास सारे मंत्रिमंडळ सहभागी झाले होते. यापूर्वी दिल्लीत असलेल्या एका मंत्र्याने "सकाळ'शी बोलताना, या वेळची गर्दी 2014 पेक्षा जास्त असल्याचे सांगितले. 
 
भाजपची ताकद दिसली 
भगव्या झेंड्यांनी व भाजपच्या कमळाकृतींच्या प्रतिकृतींनी सजलेल्या वाराणसीतून आज निघालेला हा रोड शो मोदींचे; त्याहीपेक्षा अधिक भाजपचे शक्तिप्रदर्शन करणारा ठरला. गेल्या पाच वर्षांत सत्तारूढ पक्षाने व संघानेही वाराणसीसह परिसरात कार्यकर्त्यांचे जाळे किती विस्तारले आहे, याची झलक आज दिसली. वाराणसी हा मोदींचा म्हणण्यापेक्षा भाजपचा अभेद्य गड बनल्याचा दावा पक्ष करतो; त्याला आज पूरक वातावरण दिसले. सात किलोमीटरचे अंतर कापताना हा रोड शो अस्सी, भदीनी, सोनारपूर, मदनपूर, गोंदोलिया या मार्गाने दशाश्‍वमेध घाटावर संपन्न झाला. तेथे गंगाआरतीची तयारी सुरू होती. 

लोकांची धावाधाव 
आरतीची नेहमीची वेळ कधीच टळून गेली होती. मात्र, रात्री साडेआठनंतर सुरू झालेल्या मोदींच्या गंगाआरतीसाठी लोकांनी आधीपासून येऊन जागा धरून ठेवल्या होत्या. घाटाच्या पलीकडच्या बाजूला, झाडांवर, मिळेल तिथे थांबून लोक मोदींना पाहण्यासाठी धडपडत होते. गंगाआरतीच्या वेळी भाजप अध्यक्ष अमित शहा हेही कार्यक्रमात सहभागी झाले. इकडे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह मोदी उद्या (ता. 26) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील त्या वेळी हजर राहणारे मान्यवर दी पॅरिस हॉटेलमध्ये दाखल झाले होते. याच हॉटेलात मोदींनी रात्री उशिरा काशीतील बुद्धिजीवी आणि प्रतिष्ठित वर्गाला संबोधित केले.

 

Web Title: PM Narendra Modis power demonstration in Varanasi by Roadshow