Loksabha 2019 : सिरसामध्ये 'डेरे'दार लढत

अजय बुवा
शनिवार, 11 मे 2019

नरेंद्र मोदी महात्म्यांवर तरू पाहणारा भाजप, तर डेऱ्याच्या साथीने नौका पार करण्याची आस असलेला कॉंग्रेस, असा अटीतटीचा संघर्ष येथे आहे. 

डबवाली (सिरसा, हरियाना) : हरियानात धार्मिक आखाड्याबरोबरच राजकीय आखाड्यातही डेऱ्यांचे महत्त्व कायम आहे. डेरा सच्चा सौदाचा वादग्रस्त प्रमुख गुरुमित रामरहीम लैंगिक छळाच्या आरोपांखाली सध्या तुरुंगात, तर सिरसा लोकसभा मतदारसंघामध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असलेले डेरा अनुयायी मौनात आहेत. नरेंद्र मोदी महात्म्यांवर तरू पाहणारा भाजप, तर डेऱ्याच्या साथीने नौका पार करण्याची आस असलेला कॉंग्रेस, असा अटीतटीचा संघर्ष येथे आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या आधीचा रणसंग्राम असलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप, कॉंग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय लोकदल या तीन पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा सिरसा मतदारसंघात पणाला लागलेली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर 2014 च्या निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरलेत. भाजपने माजी प्रशासकीय अधिकारी सुनीता दुग्गल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचे घर या भागातल्या टोहाना विधानसभा मतदारसंघात, तर माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे पुत्र आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अभयसिंह हेदेखील सिरसाच्याच ऐनलाबाद मतदारसंघाचे आमदार आहेत.

ग्रामीण भागात कॉंग्रेसचा प्रभाव चांगला असला तरी, मतदारांमध्ये "मोदींची प्रतिमा' हा मुद्दा चांगलाच रुजल्याचे दिसते. सुनीता दुग्गल भाजपच्या उमेदवार असल्या तरी, भाजपचा प्रचार पूर्णपणे नरेंद्र मोदी केंद्रित आहे. सिरसा जवळच्याच डबवाली गावातले शेतकरी गुरप्रीतसिंग, ""मैं ना दुग्गलने, ना भाजपाने ना जाणू, मैं तो बस मोदीने जाणू,'' ही त्यांची प्रतिक्रिया प्रचाराचा परिणाम दर्शविणारी, तर सुरवातीला पिछाडीवर असलेल्या तंवर यांनी मतदानाची वेळ जवळ येईपर्यंत संघटना बांधणी आणि प्रचारात मुसंडी मारतानाच भाजपच्या खेळीवर डेऱ्याचा उतारा काढला आहे. रामरहीमचे गुरू मानल्या जाणाऱ्या मस्तानशाह बलोचिस्तानी यांच्या डेरा मालवालीमध्ये हजेरी लावून डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांना चुचकारले आहे.

दलित शिखांचे श्रद्धास्थान असलेल्या डेऱ्यांचे अनुयायी पंजाब, हरियानात विखुरलेले आहेत. एकट्या सिरसामध्येच लाख-दीड लाखाच्या घरात असलेल्या या अनुयायांचा मतपेटीतून मिळणारा पाठिंबा सत्तेचा राजमार्ग सोपा करणारा असल्याने राजकीय पक्षांचा या मतांवर नेहमीच डोळा राहिला आहे. कॉंग्रेस, भाजप, लोकदलाकडून नेहमी मदत मागितली जाते; परंतु डेऱ्याशी लोकदलाचे फारसे सख्य नाही.

2014 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने डेऱ्याची मदत घेतली होती. रामरहीमच्या तुरुंगवारीमुळे आणि या भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर डेरा पदाधिकाऱ्यांवरील कारवाईमुळे अनुयायी भाजपवर संतापलेले आहेत. 29 एप्रिल रोजी झालेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये राजकीय पाठिंब्याबद्दल डेरा अनुयायांना सद्‌सद्विवेक बुद्धीने मतदानासाठी सांगण्यात आले आहे, तर याच मुद्द्यावर भावनिक आवाहन कॉंग्रेसकडून केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Situation in Haryana Sirsa