Loksabha 2019 : अमित शहा यांची बारामतीत उद्या जाहीरसभा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे.

बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे.

बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. भाजपच्या वतीने राजेश पांडे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, वासुदेव काळे, दिलीप खैरे, प्रशांत सातव, चंद्रराव तावरे, रंजन तावरे, अॅड. नितीन भामे, सुरेंद्र जेवरे, शिवसेनेचे अॅड. राजेंद्र काळे, रासपचे संदीप चोपडे, सुनील सस्ते आदी यावेळी उपस्थित होते. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (ता. 21) इंदापूर किंवा भिगवण येथे घेणार असून, त्याचदिवशी नितीन गडकरी भोर येथे सभा घेतील. विनोद तावडे यांच्या रविवारी फुरसुंगी व हिंजवडी येथे सभा होणार आहे. तर सिनेअभिनेत्री पूनम धिल्लों या पुण्यालगतच्या बारामती मतदारसंघात रोड शो करणार असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले. महादेव जानकर यांच्याही सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, अमित शहा खाजगी विमानाने बारामती विमानतळावर येणार असून, बारामतीची सभा उरकून ते पुण्याला जाणार आहेत. त्यानंतर कर्नाटकात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जय्यत तयारी...

रेल्वे ग्राऊंडवर अमित शहा यांच्या सभेची भाजपकडून जय्यत तयारी सुरु असून, राष्ट्रीय अध्यक्ष प्रथमच बारामतीत येत असल्याने भाजपची सर्व यंत्रणा झटून कामाला लागल्याचे आज चित्र आहे. बारामतीत अमित शहा शरद पवारांवर काय टीका करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Rally of Amit Shah on Tomorrow 19 April