Loksabha 2019 : पक्षाने 'अन्याय' केला; पण विखे पाटील अजूनही काँग्रेसमध्येच! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 April 2019

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली असली, तरीही विखे पाटील यांनी अद्याप कोणताही निर्णय जाहीर करणे टाळले आहे. अजूनही विखे पाटील यांनी पक्ष सोडत 'राजकीय धोका' पत्करलेला नाही. ​

नगर : विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतरही डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत स्वत:च्या पक्षावरच जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली असली, तरीही विखे पाटील यांनी अद्याप कोणताही निर्णय जाहीर करणे टाळले आहे. अजूनही विखे पाटील यांनी पक्ष सोडत 'राजकीय धोका' पत्करलेला नाही. 

विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा गांधी यांनी स्वीकारल्यानंतर विखे पाटील यांनी आज लोणी प्रवरा येथे पत्रकार परिषद घेतली. 'विखे पाटील काँग्रेस सोडून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करतील', अशी अटकळ बांधली जात होती. पण प्रत्यक्षात विखे पाटील यांनी आज कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. 

सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नगरची उमेदवारी मिळविली. याच मुद्यावरून राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसमध्ये वाद झाले होते. त्यावर विखे पाटील यांनी प्रथमच भाष्य केले. 'नगरची निवडणूक वैयक्तिक पातळीवर आणली होती. ही निवडणूक 'शरद पवार विरुद्ध विखे पाटील' अशी रंगविण्यात आली. वडिलांचा अपमान झालेला असताना मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला जाणे योग्य नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या प्रचाराला विरोध करेल, म्हणून मी इतर ठिकाणी प्रचाराला गेलो नाही', असे विखे पाटील म्हणाले. 

विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये साडेचार वर्षांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कारकिर्दीचा लेखाजोगाही मांडला. 'पक्षाकडून मला न्याय मिळाला नाही', अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. पक्षाकडून अन्याय झाल्याची उदाहरणे देत असतानाही विखे पाटील यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले असले, तरीही निर्णय जाहीर करणे टाळले. 'निवडणूक झाल्यानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. सर्व नेत्यांची भेट घेणार आहे', असे विखे पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhakrishna Vikhe Patil still choose to be in Congress despite quitting as Maharashtra Opposition leader