Loksabha 2019 : 'चौकीदार चोर है' मुळे काँग्रेससमोर कायदेशीर पेच; राहुल गांधींना नोटीस

पीटीआय
बुधवार, 24 एप्रिल 2019

"चौकीदार चोर है' अशी घोषणा देणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता कायदेशीर अडचणीत सापडले आहेत.

नवी दिल्ली (पीटीआय) : "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून "चौकीदार चोर है' अशी घोषणा देणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. राहुल यांनी हा शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अवमानना नोटीस बजावली आहे. 

भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सादर केलेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या अवमानना याचिकेवर 30 एप्रिल रोजी सुनावणी होणार असून, याच दिवशी "राफेल'संदर्भात 14 डिसेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पुनर्विचार याचिकाही निकाली काढल्या जाणार आहेत. ही सुनावणी एकत्रित होईल. न्यायालयाने आजच्या सुनावणी वेळी राहुल यांनी केलेली लेखी यांची अवमानना याचिका फेटाळून लावण्याची मागणीही मान्य केली नाही. आजच्या सुनावणी वेळी ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी राहुल यांची बाजू मांडली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. राहुल यांना या क्षणी नोटीस बजावणे आम्ही योग्य समजतो. न्यायालयाच्या रजिस्ट्रीनेदेखील पुनर्विचार याचिकांवरसोबत या अवमानना याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल, अशी नोंद करावी, अशी सूचना न्यायालयाने केली. 

तपशील मागितला 
मीनाक्षी लेखी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांना न्यायालयाने गांधी यांनी सादर केलेल्या खेद व्यक्त करणाऱ्या शपथपत्रामधील नेमका तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. या शपथपत्रात राहुल यांनी तापलेल्या राजकीय वातावरणामध्ये आपण हे विधान केल्याचे म्हटले होते. आम्ही शपथपत्र वाचले नसल्याने राहुल गांधी नेमके काय म्हणाले होते हे आम्हाला सांगा, असे सरन्यायाधीशांनी रोहतगी यांना सांगितले. 

चुकीचे वक्तव्य 
रोहतगी म्हणाले की, ""न्यायालयाच्या 10 एप्रिलच्या निकालाच्या अनुषंगाने आपण चुकीचे विधान केल्याचे राहुल यांनी याआधीच कबूल केले आहे. '' त्या वेळी न्यायालयाने केवळ काही दस्तावेजांच्या अनुषंगाने केंद्र सरकारने घेतलेले प्राथमिक आक्षेप फेटाळून लावले होते. राहुल यांनी उत्साहाच्या भरात वक्तव्य केले होते. न्यायालयाचे आदेश न बघता आणि वाचता त्यांनी चुकीचे वक्तव्य केले. 

कोठेतरी मर्यादा हवी 
शपथपत्राचा संदर्भ देताना रोहतगी म्हणाले की, यामध्ये माफी केवळ एका कंसामध्ये मागण्यात आली आहे, माझ्यादृष्टीने हा माफीनामा नाही, एका मुख्य राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने न्यायालयाचे आदेश न वाचताच चौकीदार नरेंद्र मोदी चोर है असे विधान केले होते. राहुल यांच्या दिमतीला एवढी आघाडीच्या वकिलांची फौज असताना ते अशा प्रकारचे वक्तव्य कसे काय करू शकतात, या धाडसी विधानांना कोठेतरी मर्यादा हवी, असे रोहतगी यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi gets notice of Defamation from SC