संगमनेरला मुक्काम अन्‌ पिठलं-भाकरीचा पाहुणचार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 April 2019

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा संगमनेरातील मुक्काम आणि त्यांनी पिठलं-भाकरी खाऊन यजमान आमदार बाळासाहेब थोरात यांचा स्वीकारलेला पाहुणचार हा विषय आज दिवसभर संगमनेरकरांच्या चर्चेत होता.

संगमनेर : कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा संगमनेरातील मुक्काम आणि त्यांनी पिठलं-भाकरी खाऊन यजमान आमदार बाळासाहेब थोरात यांचा स्वीकारलेला पाहुणचार हा विषय आज दिवसभर संगमनेरकरांच्या चर्चेत होता.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता. 26) शहरात राहुल गांधी यांची सभा झाली. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाचा दौरा करून आलेल्या गांधी यांना नाशिकजवळच्या ओझर विमानतळावरून रस्ते मार्गाने संगमनेरला यावे लागले. ते साडेनऊच्या सुमारास सभास्थळी पोचले. केवळ 26 मिनिटे आणि 35 सेकंद त्यांनी भाषण केले; मात्र परतीच्या प्रवासातील असंख्य अडचणींमुळे संगमनेरला मुक्काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. "सत्यजितजी, देर हो गयी है. मैं आज यही हॉल्ट करूंगा,' असे त्यांनी युवा नेते सत्यजित तांबे यांना सांगितले. सुरक्षिततेच्या कारणास्तव गुप्तता राखत गांधी यांचा संपूर्ण ताफा संगमनेर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात दाखल झाला. टेकडीवरील "अमृतकुटी' विश्रामगृहातील एका स्यूटमध्ये त्यांनी मुक्काम केला. 

अचानक झालेल्या या निर्णयामुळे धावपळ करीत, त्यांच्यासाठी काही कपड्यांची खरेदी झाली. पिठलं, भाकरी व शेंगदाण्याची चटणी, अशा खास मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेत राहुल यांनी आमदार थोरात यांच्यासह उपस्थितांशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. आज सकाळी उपमा आणि दूध असा नाश्‍ता केल्यानंतर ते आज थोरात यांच्यासह खासगी हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi Stay in Sangamner and Dinner