Loksabha 2019 : अंबानींना गाडी बनवता आली नाही ते विमान काय बनवणार? : राज ठाकरे

गुरुवार, 25 एप्रिल 2019

- अर्थमंत्री, मंत्रिमंडळ, आरबीआयच्या गव्हर्नरना विश्वासात न घेता करण्यात आली नोटाबंदी.

मुंबई : बालाकोटमध्ये पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारले गेले नाहीत, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. तसेच बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे तर मग भाजपने आता सांगावे की सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच अनिल अंबानींना साधी एक गाडी बनवता आली नाही ते विमान काय बनवणार, अशा शब्दांत त्यांनी राफेलवरून अंबानींवरही टीकास्त्र सोडले.

पनवेल येथे आयोजित जाहीरसभेत राज ठाकरे बोलत आहेत. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 28 हजार कोटी आरबीआयकडून घेतले. असे असेल तर सरकारकडे पैसे नसताना युद्ध कोणत्या गोष्टींवर करणार होता?, असा सवालही त्यांनी केला. तसेच ते पुढे म्हणाले, अनिल अंबानीवर कर्ज असताना राफेलचे कंत्राट त्यांना कसे काय दिले गेले. अंबानींनी साधी गाडी बनवली नाही ते विमान काय बनवणार आहे. 

नोटाबंदीच्या काळात फक्त ठराविक लोकांना लाभ करुन दिला. नोटाबंदीत भाजपशी संबंधित असलेल्या लोकांना नोटा बदलून दिल्या. याच काळात भाजपने लाभ करुन घेतला आणि तोच पैसा निवडणुकीत वापरत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

- नोटाबंदीची चौकशी झाली तर 1947 नंतरचा सर्वांत मोठा गैरव्यवहार बाहेर पडेल.

- नोटाबंदीमुळे साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या.

- पंतप्रधान मोदींनी देशाला मूर्ख बनवले.

- अर्थमंत्री, मंत्रिमंडळ, आरबीआयच्या गव्हर्नरना विश्वासात न घेता करण्यात आली नोटाबंदी.

- हरिसाल गाव डिजिटल केल्याच्या फक्त थापा मारल्या.

- भाजपचे आयटी सेलवाले फोटो उचलतात आणि जाहिरातीत वापरतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Criticizes PM Modi and Anil Ambani over Rafale Deal Issue