Loksabha 2019 : 'नोटाबंदीच्या काळात हिरावले सुमारे पाच कोटी लोकांचे रोजगार'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया', 'गंगा स्वच्छते'विषयी मोदींकडून कोणतेही वक्तव्य केले जात नाही.

नांदेड : महाराष्ट्र, देशाने भाजप आणि नरेंद्र मोदींना बहुमत दिले. मात्र, मोदी तुमच्याशी खोटं बोलत आहेत. ते 'मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया', 'गंगा स्वच्छते'विषयी कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यांनी कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच नोटाबंदीच्या काळात साडेचार ते पाच कोटी लोकांचे रोजगार गेले, असेही ते म्हणाले. 

नांदेड येथे आयोजित प्रचारसभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, मोदींकडून दिसला माईक की बोलायला सुरवात केली जाते. त्यांनी मराठवाड्यातील शेतकरी, तरुणांबाबत एक वक्तव्यही केले नाही. मोदींचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. आमचा तरुण गाव सोडून जात आहे. हेच का 'अच्छे दिन'? हेच स्वप्न आम्हाला तुम्ही दाखवले का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच ते पुढे म्हणाले, आज मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हजार फूट खोल खाली पाणी लागत नाही. अशीच जर परिस्थिती राहिली तर 50-60 वर्षांत मराठवाड्याचा वाळवंट होईल. महाराष्ट्राने देशाने बहुमत दिले, मात्र, तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलत आहात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Criticizes PM Narendra Modi and Amit Shah ahead of Lok Sabha 2019