Loksabha 2019 : 'प्रादेशिक पक्षांची आघाडी केंद्रात सत्तेवर येईल'

पीटीआय
शुक्रवार, 3 मे 2019

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात प्रादेशिक पक्षांची आघाडी केंद्रात सत्तेवर येणार असून, त्यात आम्ही "सर्वांत महत्त्वाची' भूमिका बजावू, असा दावा तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केला. "फॅसिस्ट' नरेंद्र मोदी सरकार सत्तेवरून जाईल, असे ते म्हणाले.

कोलकता : लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात प्रादेशिक पक्षांची आघाडी केंद्रात सत्तेवर येणार असून, त्यात आम्ही "सर्वांत महत्त्वाची' भूमिका बजावू, असा दावा तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केला. "फॅसिस्ट' नरेंद्र मोदी सरकार सत्तेवरून जाईल, असे ते म्हणाले.

केंद्रात भाजपेतर सरकार सत्तेवर आल्यास पंतप्रधानपदासाठी "तृणमूल'च्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी दावेदार असतील की नाही, या प्रश्‍नावर ओब्रायन यांनी मौन बाळगले. निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर मोदी सरकार जाणार आणि प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचे सरकार येणार, हे मी खात्रीपूर्वक सांगतो, असे त्यांनी सांगितले. आघाडीचा नेता कोण असणार, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""सर्व नेते आणि खासदार एकत्र बसून त्यांचा नेता कोण असावा, हे ठरवतील.

आघाडीचा नेता निवडण्यासाठी आम्हाला एक तास पुरेसा आहे. नव्या सरकारच्या स्थापनेत तृणमूल कॉंग्रेस महत्त्वाची भूमिका बजावेल.'' पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ममता बॅनर्जी असतील की नाही, या प्रश्‍नाचे उत्तर न देता, "ममता बॅनर्जी खासदार होत्या. अनेकदा केंद्रीय मंत्री होत्या आणि दोनदा मुख्यमंत्री आहेत. त्यांचे कामच सगळे सांगेल,' असे ओब्रायन म्हणाले. 

पश्‍चिम बंगालमध्ये सर्व 42 जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून ते म्हणाले, की तसे झाल्यास आम्हाला कोणाकडे जावे लागणार नाही. भाजपेतर आघाडीत कॉंग्रेसलाही स्थान असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regional parties will come to power at the Union says derek o brien