Loksabha 2019 : दुसऱ्या टप्प्यातील जन'मत' आज मतपेटीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

दुसऱ्या टप्प्यात एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

मुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 
एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे. 

या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदारसंघात असून, सर्वांत कमी दहा उमेदवार लातूर मतदारसंघात आहेत. याव्यतिरिक्त बुलडाणा मतदारसंघात 12 उमेदवार, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. पंधरापेक्षा जास्त उमेदवार असलेले चार मतदारसंघ असून, यापैकी बीड मतदारसंघात एका कंट्रोल युनिटमागे तीन बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदारसंघांत प्रत्येकी दोन बॅलेट युनिट, तर अन्य सहा मतदारसंघांत प्रत्येकी एक बॅलेट युनिट लागणार आहेत.

या निवडणुकीसाठी 62 हजार 700 ईव्हीएम (37 हजार 850 बॅलेट युनिट आणि 24 हजार 850 कंट्रोल युनिट), तर सुमारे 27 हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत. 

मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सुमारे दहा टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून, जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second Phase of Loksabha Election is Today