शरद पवार करणार मंगळवेढा, सांगोल्यातील दुष्काळाची पाहणी 

प्रमोद बोडके
Monday, 29 April 2019

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवार) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला तालुक्‍यातील दुष्काळग्रस्तांशी संवाद व या भागातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी खासदार पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात यंदा दुष्काळाची दाहकता तीव्र आहे. जिल्ह्यात सध्या पाच लाख लोकांना 215 टॅंकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. 65 च्या आसपास छावण्या सुरू झाल्या आहेत. सांगोला व मंगळवेढा तालुक्‍यात दुष्काळाची दाहकता सर्वाधिक आहे. उद्या सकाळी 10.30 वाजता खासदार पवार यांचे बारामतीहून सांगोल्यात आगमन होणार आहे. सांगोला व मंगळवेढा तालुक्‍यातील दुष्काळाची पाहणी करून ते सोलापुरात येणार आहेत. 

सोलापुरात मुक्काम करून बुधवारी सकाळी ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाण्याची शक्‍यता आहे. 2009 ते 2014 या कालावधीत माढ्याचे खासदार व देशाचे केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम पाहताना शरद पवार यांनी दुष्काळात राबवलेल्या उपाययोजनांची आज प्रखरतेने आठवण होत आहे. सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, बोर, सीताफळ, केळी, आंबा या फळांच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दुष्काळात फळबागा जगविण्यासाठी शासनाच्या खर्चातून टॅंकर उपलब्ध करून दिले होते. यंदा मात्र फळबागा पाण्या अभावी जळून चालल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar visits Mangalwedha and Sangola