Loksabha 2019 : सुजयला माझ्यासमोर आणा: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

राष्ट्रवादीला सर्वत्र अनुकूल वातावरण

राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वत्र अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीला निश्चितपणे चांगल्या जागा मिळतील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

बारामती : सुजय विखे यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी अजित पवार म्हणून मी स्विकारायला तयार होतो. मात्र, सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. मी सांगतो, सुजयला आता माझ्या समोर आणा. हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, की अजित पवार बोलतात ते खरंच बोलतात, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच सुजय याने राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढावे, असे त्यांना मी स्वत: सांगितले होते. पण त्यानेच या प्रस्तावाला नकार दिल्याने आमचाही नाईलाज झाला, असे पवार म्हणाले. 

अजित पवार पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार हे पन्नास वर्षे सक्रीय राजकारणात आहेत. त्यांनी माढ्यातून माघार घेतली. कारण राज्यसभेची मुदत 2020 पर्यंत आहे. ती जागा विनाकारणच इतरांना द्यावी लागली असती. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा. तसेच हवेचा रोख बघून शरद पवारांनी माघार घेतल्याचा आरोप निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. ज्यांच्या नावावर अनेक जण निवडून येतात, त्यांच्याबाबत असे विधान करणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, माढ्याच्या जागेबाबत एका दिवसात अंतिम निर्णय होईल व सर्वांना मान्य होईल असाच उमेदवार तेथून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

माढ्याबाबत चिंता करण्याची गरज नाही

माढ्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांसह मावळ भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पार्थ पवार यांच्या नावाचा आग्रह धरला होता. या सर्वांच्या भावनांचा आदर करुनच पार्थ पवार यांना उमेदवारी दिली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीला सर्वत्र अनुकूल वातावरण

राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वत्र अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीला निश्चितपणे चांगल्या जागा मिळतील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sujay Vikhe refused to contest the Loksabha Election on NCP ticket says Ajit Pawar