Loksabha 2019 : पराभवाच्या भीतीने 'तृणमूल' बिथरली : अमित शहा

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

कोलकत्यातील "रोड शो'दरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला. 

नवी दिल्ली : निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारामुळे दिल्लीतील वातावरण तापले आहे. कोलकत्यातील "रोड शो'दरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला. 

शहांच्या कोलकत्यामधील रोडशोमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन तृणमूल कॉंग्रेस आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. पश्‍चिम बंगालमधील पराभवाच्या भीतीने तृणमूल कॉंग्रेसचे नेतृत्व बिथरले आहे. म्हणूनच भाजपच्या नेत्यांना भीती दाखविण्यासाठी हिंसक हल्ले केले जात आहेत, असे सांगताना शहा यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 300हून अधिक जागा जिंकत असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

मागील सहा टप्प्यांमध्ये पश्‍चिम बंगाल वगळता देशातील कोणत्याही राज्यात हिंसा झाली नाही. त्यामुळे कोलकत्यातील हिंसाचारात भाजपचा सहभाग नाही, हे स्पष्ट होते तसे असते तर इतर राज्यांमध्येही हिंसा झाली असती, असे त्यांनी नमूद केले. 

विटंबना कुणी केली? 

रोड शोमधील अडीच ते तीन लाखांची गर्दी पाहून ममता बॅनर्जींचे संतुलन बिघडले, असा टोला लगावताना शहा म्हणाले की, रोड शोमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांना डिवचले आणि तीन वेळा हल्ले केले. या जीवघेण्या हल्ल्यात जीव जाण्याची भीती होती.

"सीआरपीएफ'ने आपला जीव वाचवला. मात्र, काही भाजप काही कार्यकर्त्यांचा यात बळी गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून ते म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या आवारात गेलेच नव्हते आणि पुतळा महाविद्यालयाच्या बंद खोलीत असताना तोडफोड झाली कशी, खोली कुणी उघडली, कुलूप तोडलेले नाही तर मग पुतळ्याची विटंबना कोणी केली, हे काम तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांचेच आहे, अशीही तोफ अमित शहा यांनी डागली. 

अमित शहांनी बाहेरून गुंड आणले 

"तृणमूल'चे खासदार डेरेक ओब्रायन यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजप नेतृत्वावर प्रहार केले. अमित शहा खोटारडे आहेत. त्यांनी बाहेरून गुंड आणले आणि भाजपने ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडला, असा आरोप ओब्रायन यांनी केला. भाड्याचे गुंड आणून जे केले जाते तेच अमित शहा यांनी केले. बंगालमध्ये बाहेरची माणसे काय करत होती? दिल्लीत बड्या राजकीय नेत्यावर हात उचलल्यामुळे तुरुंगात जाऊन आलेला तेजिंदर बग्गा कोलकत्यामध्ये काय करत होता, असा सवालही ब्रायन यांनी केला. तसेच हिंसाचाराच्या चित्रफितीही त्यांनी या वेळी दाखवल्या. 

दुसरीकडे कॉंग्रेसनेही या मुद्यावर तृणमूल कॉंग्रेसची पाठराखण करताना भाजपवरच हिंसाचाराचा आरोप केला. कॉंग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये भाजपकडून लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू असल्याचा टोला लगावला. थोर समाजसुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेतून स्पष्ट झाले आहे, की भाजपला प्रादेशिक परंपरा आणि संस्कृतीबद्दल आदर नाही. फक्त बंगालमध्ये हिंसाचार झाल्याचा अमित शहा यांचा दावा खोटा आहे.

त्रिपुरातील निवडणूकच हिंसाचारमुळे रद्द करावी लागली तर जमशेदपूर, मुजफ्फरपूर, अररियामध्ये हिंसाचार झाला. आपला प्रभाव नाही, अशा ठिकाणी प्रस्थापित होण्यासाठी भाजपकडून सवंग राजकीय लाभासाठी विभाजनवादी राजकारणाचा हिंसेचा वापर केला जात आहे. कोणत्याही पक्षाकडून होणाऱ्या हिंसेचा कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र शब्दांत निषेध केला जातो, असेही सिंघवी म्हणाले. 

Web Title: trinamool Congress Fear about Defeat says Amit Shah