Loksabha 2019 : काँग्रेसवर विश्वास ठेवा, आपली मेहनत वाया जाणार नाही : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मे 2019

- 'एक्झिट पोल'ला म्हटले खोटं

- कार्यकर्त्यांना सांगितले, निराश होऊ नका.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या (गुरुवार) स्पष्ट होणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसला कमी जागा मिळतील, असा अंदाज 'एक्झिट पोल'मधून व्यक्त केला जात आहे. मात्र, आता यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ट्विटवरून आवाहन केले. खोट्या 'एक्झिट पोल'च्या अपप्रचारामुळे निराश होऊ नका. पक्षावर विश्वास ठेवा, असे त्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान रविवार (ता.19) पार पडले. त्यानंतर देशभरातील अनेक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांकडून 'एक्झिट पोल' जारी करण्यात आले. यामध्ये काँग्रेसला कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यावर आता ट्विटवरून राहुल गांधी यांनी सांगितले, की पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे सतर्क आणि दक्ष राहा. घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या 'एक्झिट पोल'च्या अपप्रचारामुळे तुम्ही निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमची मेहनत वाया जाणार नाहीत.

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही एका ऑडिओ मेसेजद्वारे कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trust on Congress Party says Rahul Gandhi to Party Workers