Loksabha 2019 : राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' खोटा; गावकऱ्यांनीच केले फेसबूक लाइव्ह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

राज ठाकरेंनी दाखविलेला व्हिडीओ चुकीचा असून तो खोटा असल्याचा दावा हरिसाल गावातल्याच काही नागरिकांनी केला आहे. ठाकरेंना उत्तर म्हणून हरिसाल गावच्या उपसरपंचाने फेसबुक लाइव्ह करून गाव कसे डिजीटल आहे हे दाखवीले.

मुंबई: विदर्भातील हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून मोदी सरकारच्या काळात याचे खूप कौतुक करण्यात आले होते. या गावातील वास्तव परिस्थिती दाखविणारा व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या जाहीर सभेत दाखवीत नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टिका केली होती. मात्र, राज ठाकरेंनी दाखविलेला व्हिडीओ चुकीचा असून तो खोटा असल्याचा दावा हरिसाल गावातल्याच काही नागरिकांनी केला आहे. ठाकरेंना उत्तर म्हणून हरिसाल गावच्या उपसरपंचाने फेसबुक लाइव्ह करून गाव कसे डिजीटल आहे हे दाखवीले.

अमरावती जिल्ह्यात येणारे हरिसाल गाव राज ठाकरेंच्या सभेनंतर चर्चेचा विषय ठरले होते. या विषयी हिरसालचे उपसरपंच गणेश येवले म्हणाले, "राज ठाकरेंनी जाहीर सभेत हिरसालचा व्हिडीओ दाखवून गावाची देशभर बदनामी केली आहे. त्यांनी दाखविलेला व्हिडीओ खोटा असून परिस्थिती अगदी उलटी आहे. गावात जर डिजीटल नसते तर आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकता आला नसता",

उपसरपंच यवले यांनी, या फेसबूक लाइव्हमध्ये गावातील डिजीटल रूम, शाळेत कॉम्पुटर लॅब, एचपी, माइक्रो सॉफ्ट आदी प्रकारचे तंत्रज्ञान गावात पोहचल्याचे दाखविले आहे. गावात इंटरनेटसाठीचे नेटवर्कही चांगले असल्याचे सांगत राज ठाकरे राजकीय फायद्यासाठी गावाची बदनामी करत असल्याचे येवले सांगत आहेत.

उपसरपंच येवले यांनी डीजीटल व्यवहार कसे चालतात हे दाखविण्यासाठी ऑनलाइन पैसे ट्रांसफर करणे, ड्रायव्हिंग लायसेंससाठी आणि आधारकार्ड साठी ऑनलाइन फॉर्म भरणे या सर्व गोष्टी होत असल्याचे दाखवील आहे.

येवले यांनी केलेल्या फेसबूक लाइव्ह मध्ये गावातील तरुण, विद्यार्थी आणि महिलांशीही संवाद साधला. गावातील दुकानदारांशी संवाद साधत इंटरनेट व्यवस्थित चालत असल्याचे सांगितले. गाव डिजीटल झाल्यापासून गावात पर्यटन वाढल, लोकांना रोजगार मिळाला, पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी गावातच दहा गाईड तयार झाले. अनेक महिलांना मशीन चे ट्रेनिंग देण्यात आले आहे. ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना शिवणकाम, बॅग्स बनविण्याचे कामाचे प्रशिक्षण देण्यात येते असल्याचेही येवली यांनी सांगितले.

येवले यांनी राज ठाकरेंच्या व्हिडीओला दिलेल्या एवढ्या मोठा उत्तरानंतर मनसेकडून आतापर्यंत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers showed the digital village from Facebook live