कोरोना विजयामध्ये अकोला राज्यात चौथ्या स्थानी!,  गोंदिया राज्यात प्रथम, भंडारा द्वितीय

विवेक मेतकर
Monday, 27 July 2020

कोरोना विषाणूने राज्यभर थैमान घातले आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या व मृतकांचा आकडा वाढत आहे. असे असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे.

अकोला  ः कोरोना विषाणूने राज्यभर थैमान घातले आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या व मृतकांचा आकडा वाढत आहे. असे असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे.

राज्याच्या स्थितीचा विचार करता कोविड-19 रोगावर मात करण्यामध्ये (रिकव्हरी रेट) अकोला चौथ्या स्थानी आहे, तर गोंदिया, भंडारा व सिंधुदूर्ग अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी आहे.

कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर आता राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू करण्यात आले आहे. या काळात प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संसर्गाने होणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव सुद्धा वाढत आहे.

परिणामी कोरोनाबाधितांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी कोरोनाला हरवणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण बाधित आढळत असले तरी त्यावर मात करणाऱ्यांची संख्यासुद्धा हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट चांगला असल्याचे दिसून येत आहे.

चांगला रिकव्हरे रेट असलेले जिल्हे
गोंदिया जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत 233 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे गोंदियाचा रुग्ण रिकव्हरी रेट 90.13 टक्के आहे. भंडारा जिल्ह्यात 200 रुग्ण आढळले असून 170 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 85 टक्के आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात 306 रुग्ण आढळले असून 247 रुग्ण बरे झाले आहेत. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 80.72 टक्के आहे. रिकव्हरी रेटमध्ये अकोला राज्यात चौथ्या स्थानी आहे. अकोल्यात 2 हजार 289 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1 हजार 726 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे रिकव्हरी रेट 75.40 टक्के, तर मुंबईचा रिकव्हरी रेट 73.15 टक्के आहे. मुंबई राज्यात पाचव्या स्थानी आहे.

वाईट रिकव्हरे रेट असलेले जिल्हे
विदर्भातील वर्धा जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत 104 रुग्ण आढळले. त्यापैकी 45 बरे झाले. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 43.27 टक्के आहे. बीडमध्ये 178 रुग्ण आढळले असून 189 रुग्ण बरे झाल्याने रिकव्हरी रेट 39.54, पुणे येथे 69 हजार 919 रुग्ण आढळले असून, 24 हजार 415 बरे झाल्याने 34.32, कोल्हापूर 31.37 व बुलढाण्यात 905 रुग्ण आढळले असून 247 बरे झाल्याने या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 27.29 टक्के म्हणजे राज्यात सर्वात कमी आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourth place in Akola State in Corona Vijaya !, First in Gondia State, Second in Bhandara