
नुरा कुस्ती त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडवायची. लढत चितपट झाल्यावरच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटायचे
कोल्हापूर : कुस्ती मैदान कोठेही असो, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे अर्थात अण्णा नक्की हजर. सर्व वयोगटातले पैलवान आदबीनं त्यांना नमस्कार करणार. त्यांच्या पाठीवर हात ठेवत. खंचनाळे यांची भेदक नजर मात्र मैदानातल्या लढतींवर स्थिर. कुस्ती निकालीच झाली पाहिजे, हा त्यांचा अट्टहास. नुरा कुस्ती त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडवायची. लढत चितपट झाल्यावरच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटायचे. पैलवानांनी मेहनतीने देशाचे नाव मोठे करावे, ही भावना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली. त्यांच्या दोस्तीचं पानही प्रभावी होतं. त्याचे पदर उलगडावेत तेवढे थोडेच आहेत. ते कोल्हापुरी बाण्याने सजलेले होते.
खंचनाळे अण्णा पहिले हिंदकेसरी होते. मुलांनी कुस्तीचा वारसा चालवावा, अशी त्यांची इच्छा असणे साहजिक होते. सत्यजित व रोहित त्यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. सत्यजितच्या अंगाला लाल माती लागली. त्याने करिअरसाठी यू टर्न घेत बीपीएड्, एमपीएड्. केले. रोहितने चार वर्षे कुस्तीत रग दाखवली. तो गोकुळ केसरी स्पर्धेतील ८४ गटात विजेता ठरला. दुखापतीने त्याची कुस्ती सुटली. खंचनाळे यांनी त्याचे फारसे वाईट वाटले नाही. मुलांचा मैदानाशी नाळ तुटता कामा नये, ही त्यांची भावना होती. फुटबॉलच्या मैदानात रोहितने पाय ठेवला. मुलापेक्षा मित्रत्वाच्या नात्यातून ते त्याच्यासह सत्यजितला पाठबळ देत राहिले.
अण्णांचा स्वभाव विलक्षण होता. त्यांची जडणघडण शाहूपुरी तालमीत झाली असली तरी त्यांचा अन्य तालमीतील पैलवानांवर कटाक्ष होता. दीनानाथसिंह यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते. दीनानाथसिंह १९६६ ला कंबरदुखीने त्रस्त होते. मुंबईला होणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी जावे, की नको, अशा द्विधा मनस्थितीत ते होते. वस्ताद म्हमुलालांकडे दुखण्यावरचा रामबाण इलाज होता. खंचनाळेंची ऊठबस वस्तादांकडे होती. तेथे त्यांना दीनानाथसिंहांच्या दुखण्याबद्दल कळाले. शाहू विजयी गंगावेस तालमीत जाऊन त्यांनी ‘पैलवान तुझ्या शरीरात करंट आहे. तू महिन्यात बारा दिवस झोपलास अन् अठरा दिवस मेहनत केलास तरी महाराष्ट्र केसरी तूच होणार,’ असा आत्मविश्वास पेरला. त्यांचा शब्द खरा ठरला. दीनानाथसिंहांच्या नावापुढे हिंदकेसरी किताब झळकला.
हेही वाचा- ‘गोकुळ’मध्ये मुश्रीफ कोणासोबत? राजकीय क्षेत्राला पडला प्रश्न -
अण्णांचे हिंदकेसरी मारुती माने व हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्याशी भलतीच दिलजमाई होती. तिघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे होते. एकत्र आल्यावर एकमेकांची थट्टामस्करी करण्यातही पुढे होते. मारुती माने यांच्या निधनाने ते अस्वस्थ होते. कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघात अण्णा सक्रिय होते. त्यांच्याकडे संघाच्या अध्यक्षपदाची धुरा काही काळ होती. आंदळकर वस्ताद संघापासून चार हात दूर होते. ते संघात नसले तरी दोघांच्या मैत्रीच्या नात्यात कधीच दरी पडली नाही. दोघे भेटले की एकमेकांची विचारपूस करायचे. आंदळकरांची साथ सुटल्यानंतर त्यांच्या मैत्रीचा धागा तुटला. जिवाभावाचा मित्र गमावल्याचं दु:ख त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत बोचत राहिलं. मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी अनेकांना मदत करण्यातही पुढाकार घेतला. उतारवयात दुखण्यानं त्यांना ग्रासलं तरी त्यांच्यातील मैत्रीचा कोल्हापुरी बाणा जागता राहिला. पैलवानांच्या अडचणींत धावून जाण्या५६चा त्यांचा स्वभाव बदलला नाही.
संपादन- अर्चना बनगे