Success Story: पाच वर्षांत 70 टन पेरूचे उत्पादन घेऊन गलगलेचे शिवराज झाले लखपती

success story farmer shivraj salunke nanibai chikhali kolhapur
success story farmer shivraj salunke nanibai chikhali kolhapur

नानीबाई चिखली (कोल्हापूर) : ऊस,केळी सारख्या अधिक कालावधीच्या तसेच अधिक पाणी लागणाऱ्या पिकांना फाटा देत त्यांनी पेरूची फळबाग करण्याचा निर्णय घेतला. अन् कुटुंबातील सदस्यांच्या साथीने त्यांनी सहा वर्षापूर्वी तीन एकरात पेरूची फळबाग फुलवली. यातून गेल्या पाच वर्षांत त्यांनी 70 टन पेरू उत्पादन घेऊन सुमारे 35 लाख रूपयांचा नफा मिळविला. गलगले ( ता. कागल ) येथील शिवराज साळोखे यांनी तालुक्यात अशाप्रकारचा वेगळा प्रयोग करत अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. पहिल्या सात महिन्यात एका बहारात एकरी आठ टन उत्पादनातून लाखो रूपयांचे मिळविलेले उत्पन्न त्यांच्या आयुष्यात गोडवा देणारे ठरले आहे.

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शिवराज साळुंखे यांची ही प्रेरणादायी यशोगाथा. घरची असणारी आठ एकर शेती. या शेतीत त्यांनी सुरुवातीला अनेक प्रयोग राबविले. यामध्ये शेवगा, मिरची, आले, ढबू मिरची पिके घेतली. मात्र त्यांना अपेक्षित असा फायदा झाला नाही. त्यानंतर ऊस पीक घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या गावात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा तेथे आठ एकर ऊस शेतीला पाणी कसे द्यायचे हा प्रश्न त्यांना नेहमी भेडसावत होता. 

दरम्यान 2013 मध्ये त्यांना पुणे येथील कृषी प्रदर्शनात कमी पाण्यावर येणाऱ्या पेरू फळाची माहिती मिळाली. आणि येथेच त्यांनी पेरूची फळबाग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पंढरपूर, मोहोळ येथे जात या पिकाची अधिक माहिती मिळवली. त्यानंतर रायपूर ( छत्तीसगड ) येथून 170 रुपयाला एक रोप( वाहतुकीसहित ) याप्रमाणे व्हीएनआर जातीचे 1300 रोप आणले. 

2014 मध्ये रोपांची लावण करण्यापूर्वी तीन एकर जमिनीची दोन वेळा उभी-आडवी नांगरणी केली. त्यानंतर प्रत्येकी दहा बाय आठ फूट अंतरावर गादीवाफे तयार करीत रोपांची लावण केली. लावलेल्या प्रत्येक रोपाला दहा किलो शेणखत,निंबोळी पेंड अर्धा किलो,डीएपी 100 ग्रॅम, एमओपी 100 ग्रॅम अशी खतांची मात्रा दिली. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा ड्रीपची खते, जीवामृत, औषध फवारणी केली. तयार झालेल्या फळबागेला ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली. 

बरोबर वर्षाने पेरूचा बहर धरला. लिंबूच्या आकाराचे फळ झाल्यानंतर त्यास बॅगींग केले. एका झाडाला जास्तीत जास्त 35 ते 40 फळे त्यांनी ठेवली. फळधारणेपासून पाच महिण्यात पेरूची पुर्ण वाढ झाली. सात महिन्यांच्या एका हंगामात त्यांना एकूण 7 ते 8 टन उत्पादन मिळते. आकाराने मोठा तसेच रूचकर असलेल्या पेरूस कोल्हापूर, जयसिंगपूर येथून मोठी मागणी असते. 

गेली पाच वर्षे ते पेरू पिक घेतात. यासाठी त्यांना खते, औषधे यासाठीचे 50 हजार रूपये तर बॅगींगसाठी 30 हजार रुपये असा एकरी 80 हजार रुपये खर्च केला. सव्वा वर्षात दोन बहार घेता येतात. योग्य व्यवस्थापन, छाटणी आदी गोष्टी जमल्या तर प्रत्येक हंगामात उत्पादन चांगले निघते. यामुळेच कमी पावसावर येणारे पेरूचे पिक त्यांना एका बहाराला लाखो रूपये मिळवून देत आहे. 

लॉकडाऊनमध्ये बारा लाखांचे उत्पन्न पूर्ण

वाढ झालेल्या पेरूचे वजन अर्धा किलो पासून दीड किलो आहे. लॉकडाऊन काळात याच पेरूला पन्नास रुपये दर मिळाला. तर स्थानिक पातळीवर 80 रूपये प्रमाणे विक्री केली. एकरी 8 टन याप्रमाणे तीन एकरात 24 टन उत्पादन निघाले. यातून एका बहाराला त्यांना 12 ते 13 लाखांचे उत्पन्न मिळाले. 

कमी पाणी, कमी कष्ट, कमी खर्चात निघणारे पीक कोणते याविषयीची माहिती घेताना कृषी प्रदर्शनात पेरू पिकाची माहिती मिळाली. धाडस करीत सव्वादोन लाख रुपये गुंतवत पेरू फळबाग करण्याचा निर्णय घेतला. आज पाच वर्षे झाली.अजून रोपे दहा वर्षे टिकतील. यापुढेही यातून चांगले उत्पादन काढू

  शिवराज साळोखे, शेतकरी

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com