Maratha Kranti Morcha: आवाहन - शांतता, संयमाची कसोटी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

जगाला नोंद घ्यायला लावणारी कर्तबगारी, रणांगणातील शौर्य, तसेच संघर्षकाळातही सद्‌वर्तन- संयमाच्या देदीप्यमान इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजासाठी आजचा, नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन अत्यंत महत्त्वाचा, समाज म्हणून कसोटी पाहणारा आहे. नव्या पिढीच्या भवितव्यासाठी चिंतेत असणारा समाज आरक्षण व अन्य सवलतींसाठी गेली दोन वर्षे संघर्ष करतो आहे. ऑगस्ट क्रांतीदिनाचे वेगळे महत्व महाराष्ट्रात मराठा समाजासाठी आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे समाजातील एका लेकीवर अमानुष बलात्कार व निर्घृण हत्येच्या निषेधार्थ औरंगाबादला दोन वर्षांपूर्वी याच दिवशी सकल मराठा समाजाचा पहिला मूक मोर्चा निघाला.

त्यानंतर अत्यंत शिस्तीत, कमालीचा संयम दाखवत लाखोंच्या गर्दीतून रुग्णवाहिकांना वाट करून देणारे सत्तावन्न मूक मोर्चे राज्याने अनुभवले. त्या मूक आक्रोशाची दखल देशाने, जगाने घेतली. अखेरचा ५८ वा मोर्चा गेल्या वर्षी ऑगस्ट क्रांतिदिनी मुंबईत निघाला. सरकारच्या कृतीची वाट पाहताना समाजाने त्यानंतर वर्षभर दाखविलेला संयमही वाखाणण्याजोगा आहे. गेल्या तीन आठवड्यांत राज्याच्या विविध भागांत मोर्चे, निदर्शने, ठिय्या, रास्ता रोको अशा मार्गांनी समाजाने संताप व्यक्‍त केला. दुर्दैवाने त्या आंदोलनांना जाळपोळ, तोडफोड अशा हिंसक घटनांचे गालबोट लागले. औरंगाबादपासून सुरू झालेले मराठा तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र तर अधिकच चिंतेची बाब आहे.

आता राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी समाजातील मान्यवरांसोबत बैठकीत व नंतर दूरदर्शन, रेडिओवरून संपूर्ण समाजाला संबोधित करताना आरक्षणासह सर्व प्रश्‍न सोडविण्याचा शब्द दिला आहे. मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये वसतिगृहे, तसेच उद्योग- व्यवसायासाठी कर्जाच्या दृष्टीने सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालासाठी खोळंबलेला आरक्षणाचा मुद्दा सोडला, तर सरकारच्या हातात असलेल्या अन्य बहुतेक मागण्या दोन पावले का होईना पुढे गेल्या आहेत. याउपर, मराठा समाजाची आंदोलनाची भावना अत्यंत संवेदनशील पद्धतीने समजून घेताना मुंबई उच्च न्यायालयाने न्यायप्रविष्ट प्रकरणात आंदोलन नको, माणसाच्या जिवाची किंमत कोणत्याही आंदोलनापेक्षा अधिक आहे, असे सांगताना संपूर्ण समाजाला सबुरीचा सल्ला दिला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर, उद्या गुरुवारी ऑगस्ट क्रांती दिनाचे व मराठा मूक मोर्चांच्या दुसऱ्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून होणारा ‘महाराष्ट्र बंद’ शांततेत पार पाडण्याची, हिंसाचार होऊ न देण्याची, आंदोलनाला गालबोट लागणार नाही ही काळजी घेण्याची, समाजाकडे बोट दाखविण्याची संधी कोणाला मिळणार नाही हे पाहण्याची, जबाबदारी केवळ आंदोलनाचे नेतृत्व करणारे समन्वयक व नेत्यांची नाही, तर ती संपूर्ण समाजाची आहे. समाजाने हा कसोटीचा क्षण समजून क्रांतीला शांतीचे अधिष्ठान दिले, तर अन्य समाजघटकांपुढे नवा आदर्श उभा राहील. त्याचप्रमाणे अशा सामाजिक प्रश्‍नांवरील आंदोलनात आवश्‍यक असलेला व्यवस्थेशी संवादाचा धागा तुटणार नाही. 
- संपादक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation Appeal peace Restraint