Martha Kranti Morcha: घडले माणुसकीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

औरंगाबाद - संपूर्ण मराठवाड्यात कडकडीत बंद असताना गुरुवारी बहुतांश ठिकाणी आंदोलकांनी माणुसकीसह, सकारात्मकतेचे दर्शनही घडविले. रक्तदान शिबिरे, आंदोलकांसाठी चहा, फराळ, जेवणाची व्यवस्था, आंदोलनानंतर स्वच्छता, रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देणे अशा विविध बाबींनी आंदोलकांमधील माणुसकीचे दर्शन घडविले.   

औरंगाबाद - संपूर्ण मराठवाड्यात कडकडीत बंद असताना गुरुवारी बहुतांश ठिकाणी आंदोलकांनी माणुसकीसह, सकारात्मकतेचे दर्शनही घडविले. रक्तदान शिबिरे, आंदोलकांसाठी चहा, फराळ, जेवणाची व्यवस्था, आंदोलनानंतर स्वच्छता, रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देणे अशा विविध बाबींनी आंदोलकांमधील माणुसकीचे दर्शन घडविले.   

औरंगाबादमध्ये रेल्वे रुळावर ठाण मांडून बसलेले आंदोलक आणि बंदोबस्तातील पोलिसांना मुस्लिम समाजाच्या वतीने चहापाणी देण्यात आले. क्रांती चौक, सिडको चौक, सेव्हन हिल परिसरांतून दिवसभरात ३० ते ३५ रुग्णवाहिकांना आंदोलकांनी तत्काळ रस्ता मोकळा करून दिला. सिडको चौकात युवकांनी साफसफाई केली तर हेडगेवार रुग्णालयात रुग्णांना पोचता यावे यासाठी परिसरात ‘रास्ता रोको’ केला नाही. जालन्यातही आंदोलकांनी अनेक रुग्णवाहिकांना वाट मोकळी करून दिली. काही ठिकाणी आंदोलकांसाठी चहापानासह दुपारच्या भोजनाचीही व्यवस्था, तर पोलिसांसाठी अल्पोपाहाराची सोय केली होती. बीडमध्ये आंदोलकांनी आठ ठिकाणी रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून दिला. भजन करून रस्त्यावरच स्वयंपाक आणि जेवणावळीचा कार्यक्रम झाला. परळी-बीड रस्त्यावर खिचडी शिजवून सहाशेहून अधिक आंदोलकांच्या रस्त्यावरच पंगती बसविण्यात आल्या. कुंबेफळ (ता. केज) येथे केज-अंबाजोगाई राज्य महामार्गावरच स्वयंपाक बनविण्यात आला. कोळपिंपरी (ता. किल्लेधारूर) येथे आंदोलकांना आढळलेला देशी दारूचा ट्रक पोलिसांच्या मदतीने सुरक्षितपणे एका जिनिंगमध्ये लावण्यात आला.

उस्मानाबादेत रक्तदान 
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात मराठा समाजाच्या २८६ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सकारात्मकतेचे दर्शन घडविले. 

मुस्लिमांचा सहभाग
औसा, लातूर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबादसह अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी आंदोलकांसाठी चहा-फराळाची सोय केली व मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.

अन्‌ कडेगाव बसस्थानकात स्वच्छता
सांगली - आंदोलनादरम्यानच्या काही घटना सुखद असतात, सकारात्मक असतात. कालच्या आंदोलनादरम्यान अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये घडली. मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी नऊ ऑगस्टला बंदची हाक दिली, त्याच दिवशी सांगली जिल्ह्यातील कडेगाव बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक मिथुन देशमुख यांनी बसस्थानक धुवून घेतले. एसटी बंद असल्याने प्रवासी येणार नाहीत म्हणून त्यांनी आंदोलनाच्या दिवशीच बसस्थानक धुण्याचा ‘मुहूर्त ‘साधला. ज्या कंपनीकडे बसस्थानक स्वच्छतेचा ठेका आहे त्यांचा एक माणूसच हजर होता, मग वाहतूक नियंत्रक देशमुख यांनी स्वतः हातात पाण्याचा नळ धरत त्या कर्मचाऱ्यासोबत तीन तास श्रमदान केले. स्वतः साहेबच एसटी बसस्थानक धुवायला लागले, हे पाहून आसपासच्या लोकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. देशमुख म्हणाले, ‘‘प्रवाशांची गर्दी असते तेव्हा बसस्थानक स्वच्छ करता येत नाही. प्रवाशांच्या अंगावर पाणी उडाले किंवा अजून काही झाले, तर अनेकदा कर्मचारी आणि प्रवासी यांचे किरकोळ वादही होतात. आजच्या बंदचा आम्ही सकारात्मक उपयोग करायचे ठरवले. स्थानकावर गर्दी नसल्याने आजचा दिवस आमच्यासाठी स्वच्छता  करायला महत्त्वाचा होता, आम्ही तो सत्कारणी लावला.’’

आंदोलनातही मदतीचा हात
नांदेड - एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे अडचणीत सापडलेल्या व्यक्तींसाठी मदतीचा हात देत आंदोलकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. नायगावला आंदोलनकर्त्यांसाठी हेडगेवार चौकात आमदार वसंत चव्हाण यांच्या मित्रमंडळाकडून भोजन व्यवस्था करण्यात आली. मांजरम (ता. नायगाव) येथे मराठा कार्यकर्त्यांसाठी मुस्लिम समाजाने भोजनाची सोय केली होती. कुंटूर फाट्यावर परिसरातील मराठा तरुणांनी पदरमोड करून ‘रस्ता रोको’त अडकून पडलेल्या ट्रकचालकांच्या जेवणाची सोय करत दातृत्व जोपासले. अर्धापूरजवळील दाभड येथे रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी रुग्णवाहिकेला तत्काळ रस्ता मोकळा करून दिला. तसेच दगडापूर (ता. बिलोली) व परभणीसह झरीत (ता. परभणी) आंदोलकांनी रुग्णवाहिकेला वाट देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. कोल्हा (ता. मानवत) येथे राष्ट्रीय महामार्गावर जनावरे सोडण्यात आली व त्यांच्यासाठी चारा पाण्याची सोय करण्यात आली. परभणीत भजन आंदोलनात अल्पोहाराचे वाटप केले. खानापूर फाटा येथे आंदोलनानंतर स्वयंसेवकांनी परिसराची स्वच्छता केली.

आंदोलनस्थळी पार पडले शुभमंगल 
गांधीग्राम (जि. अकोला) - मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ‘बंद’ची हाक गुरुवारी दिली असतानाच, अकोट शहरातील शिवाजी चौकात मात्र आंदोलनादरम्यानच शुभमंगल पार पडले. या विवाहाला आंदोलनकर्त्यांनीही सहकार्य केले. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आज ‘बंद’ पुकारला होता. याच वेळी गांधीग्राम येथील पांडुरंग अढाव यांचा मुलगा अभिमन्यू आणि देऊळगाव येथील हरिदास गावंडे यांची कन्या तेजस्विनी यांच्या विवाहाची तिथी होती. गांधीग्रामपासून अकोटला जाण्यास निघालेल्या मंडळीच्या मनात आंदोलनामुळे धाकधूक होती. परंतु, आंदोलकांनी त्यांना न अडविता जाऊ दिले. अकोटला पोचल्यानंतर शिवाजी चौकात आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. वर व वधू पक्षाच्या मंडळींनी त्यांना विनंती केली अन्‌ आंदोलनकर्त्यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले. त्यानंतर विवाह पार पडला. या विवाहाची चर्चा दिवसभर शहरात होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh ambulance