#MarathaKrantiMorcha कायम टिकणारे आरक्षण देऊ - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 1 August 2018

मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करणार आहे. आरक्षणासाठी अध्यादेश आजही काढला जाऊ शकतो, मात्र ते न्यायालयात टिकणार नसल्याने मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करणार आहे. आरक्षणासाठी अध्यादेश आजही काढला जाऊ शकतो, मात्र ते न्यायालयात टिकणार नसल्याने मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आलेल्या छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार याचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. ""मराठा आरक्षणासाठी आजही अध्यादेश काढला जाऊ शकतो; परंतु ते न्यायालयात टिकणार नाही,'' असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. ""मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार असून, राज्य सरकार या बाबी निश्‍चित पूर्ण करणार आहे,'' अशी माहिती देतानाच मराठा आरक्षणाचा मुद्दा हा निकाली काढू आणि मराठा समाजाला जर कोण आरक्षण देईल तर ते हेच सरकार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

आरक्षण देताना केवळ भावनेत वाहून गेलो तर आक्रोश तयार होईल. त्यामुळे आरक्षणासंदर्भात कायदेशीर बाबी समजून घ्याव्याच लागतील. सध्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणारी जाळपोळ आणि ठिकठिकाणी तरुणांनी केलेल्या आत्महत्येच्या घटना व्यथित करणाऱ्या असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

अहवाल येताच अधिवेशन 
""मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आमच्या सरकारने केला, मात्र त्याला न्यायालयाने स्थगिती दिली. आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिकपणे काम करत असून कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, यासाठी प्रयत्न करत आहोत,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मागासवर्ग आयोगाची निर्मिती आमच्याच सरकारने केली आहे. आरक्षणासंदर्भात या आयोगाच्या अध्यक्षांनी वेगाने काम सुरू केले आहे. आयोगाला लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली असल्याने अहवाल येताच विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

आरक्षणाची धग
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे मोर्चा 
आरक्षणाला मंजुरी न दिल्यास धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना प्रवेशबंदी
वाशीममध्ये रास्ता रोको
बीडमधील विडा येथील अभिजित देशमुख या तरुणाची आत्महत्या.
लातूरच्या औसा येथे तहसील कार्यालयात आठ जणांचा रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न
औरंगाबादच्या वैजापूरमध्ये मन्याड धरणात चार युवकांचा उड्या मारण्याचा प्रयत्न
कायगाव येथे काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी बुधवारी (ता. १) असल्याने बंदोबस्त वाढविला
आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने पहिले पाऊल उचलावे, अशी मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक, वृत्त न्यायाधीश बी. एन. देशमुख यांची औरंगाबादेतील बैठकीत मागणी
नांदेड-मुखेड बस जाळली
परभणी जिल्ह्यात आंदोलन
कोल्हापूरमध्ये ठिय्या आंदोलन सुरूच
नाशिक जिल्ह्यात शिवसेना आमदारांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Removing an Ordinance will not maintain the reservation says CM