फादर फ्रान्सिस दिब्रिटो आज औरंगाबादेत काय बोलणार?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

मराठवाड्यातील साहित्यिकांनी एकत्र येत फादर आणि साहित्य महामंडळाची पाठराखण केली होती. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सभेत फादर या साहित्यिकांप्रती काय भावना व्यक्त करतात आणि त्या वादावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

औरंगाबाद : उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जाहीर सत्कार मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने बुधवारी (ता. 16) केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर ते औरंगाबादेत काय बोलणार, याची साहित्यविश्‍वात उत्सुकता आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्यानंतर उसळलेल्या वादात मराठवाड्यातील साहित्यिकांनी दिब्रिटो यांची पाठराखण केली. "मराठी साहित्य समृद्ध करण्यात ख्रिस्ती लेखकांचे योगदान मोलाचेच राहिले आहे. फ्रान्सीस दिब्रिटो यांची संमेलनाध्यक्षपदी केलेली निवड ही धर्मप्रचारक म्हणून नव्हे, तर मराठी भाषक लेखक म्हणून केलेली आहे. फ्रान्सीस दिब्रिटो यांनी केलेले लेखन मानवतावादाची साक्ष आहे. दिब्रिटो यांना धर्मद्वेषातून लक्ष्य करणे असहिष्णू वृत्तीचे लक्षण आहे. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि मिलिंद जोशी यांना धमक्‍या देणाऱ्या दुष्प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो,' अशा शब्दांत मराठवाड्यातील साहित्यिकांनी एकत्र येत फादर आणि साहित्य महामंडळाची पाठराखण केली होती. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सभेत फादर या साहित्यिकांप्रती काय भावना व्यक्त करतात आणि त्या वादावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

सुप्रसिद्ध कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात बुधवारी (ता. 16) सायंकाळी 6 वाजता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सत्कार केला जाणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील राहणार आहेत. याप्रसंगी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या व्यक्तिमत्वावर आणि साहित्यावर प्रा. जयदेव डोळे आणि डॉ. ऋषीकेश कांबळे हे भाष्य करणार आहेत.

ज्या व्यक्तींना आणि संस्थांना फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सत्कार करायचा असेल, त्यांनी आपली नावे मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात अथवा कार्यवाह डॉ. दादा गोरे यांच्याकडे द्यावीत. या कार्यक्रमासाठी रसिकांनी उपस्थित राहावे, अशी विनंती साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, उपाध्यक्ष प्रा. किरण सगर आणि कार्यक्रम समितीचे कैलास इंगळे यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: felicitation of father francis dibrito in aurangabad today