तुळजापुरात पहिल्यांदाच फुलले कमळ - काय केली राणांनी कमाल? । Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत येथे भाजपला यश मिळाले नव्हते. मात्र या निवडणुकीत श्री. पाटील यांनी जनतेचा कौल मिळविला. त्यामुळे तुळजापूर मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे.

तुळजापूर : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे राणा जगजितसिंह पाटील विजयी झाले. त्यामुळे तुळजापूर मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. सलग चारवेळा या मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांचा त्यांनी पराभव केला.

इथे मात्र - कॉंग्रेसचं सेलिब्रेशन, भाजपचा काढता पाय 

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात होते. मात्र तिरंगी लढत झाली. त्यात भाजपचे राणाजगजितसिंह पाटील हे 23 हजार 196 मतांची आघाडी घेऊन विजयी झाली. गुरुवारी (ता. 24) सकाळी येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणीला सुरवात झाली.

पहिल्या फेरीपासून भाजपचे पाटील हे आघाडीवर होते. प्रत्येक फेरीच्या मतमोजणीनंतर त्यांना आघाडी मिळत गेली. श्री. पाटील यांना 99 हजार 34 मते मिळाली तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांना 75 हजार 865 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे यांना 35 हजार 153 मते मिळाली. भाजपचे श्री. पाटील हे 23 हजार 169 मतांनी विजयी झाले.

माजी मंत्री असलेले आमदार चव्हाण आणि माजी राज्यमंत्री असलेले पाटील हे दोघे उमेदवार असलेल्या या मतदारसंघातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे आमदार चव्हाण हे या मतदारसंघातून सलग चारवेळा निवडून आले होते. 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर उस्मानाबाद तालुक्यातील 72 गावांचा तुळजापूर मतदारसंघात समावेश करण्यात आला.

त्यानंतर झालेल्या 2009 व 2014 मधील निवडणुकीतही आमदार चव्हाण यांनी विजय मिळविला होता. गेल्या 20 वर्षांत मतदारसंघातील केलेल्या विकासाच्या बळावर निवडून येण्याचा दावा आमदार चव्हाण यांच्याकडून करण्यात येत होता. तरीही त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

पावणेदोन महिन्यांपूर्वी राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी श्री. पाटील यांनी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. युतीतून तुळजापूर मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे श्री. पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढविली. मतदारसंघ आणि जिल्ह्याचा विकास, मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळविणे, असे मुख्य मुद्दे घेऊन पाटील यांनी प्रचार केला होता. 2009 पासून हा मतदारसंघ युतीतून भाजपला सुटलेला आहे.

यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत येथे भाजपला यश मिळाले नव्हते. मात्र या निवडणुकीत श्री. पाटील यांनी जनतेचा कौल मिळविला. त्यामुळे तुळजापूर मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. या निवडणुकीत एकूण 18 उमेदवार नशीब अजमावत होते. प्रहार जनशक्तीचे महेंद्र धुरगुडे यांना सात हजार 423 मते मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Tuljapur Osmanabad final result Rana Jagjitsing Won