हाती 'शिवबंधन' बांधल्यानंतर, मिलिंद नार्वेकरांविषयी काय म्हणाले भास्कर जाधव?

हाती 'शिवबंधन' बांधल्यानंतर, मिलिंद नार्वेकरांविषयी काय म्हणाले भास्कर जाधव?

मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे कार्यकर्ते असणाऱ्या जाधव यांनी २००४मध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांच्या यादीत त्यांचा समावेश होता. राज्यातील आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रीपदही भूषविले. पण, त्यावेळी गैरसमजांमुळे मी शिवसेना सोडली होती, असे स्पष्टीकरण आज, जाधव यांनी शिवसेना प्रवेशानंतर दिले.

‘मी तर शिवसैनिकच’ 
भास्करराव जाधव म्हणाले, ‘मी तर जन्मानेच शिवसैनिक आहे. काही गैरसमजांमुळे मी शिवसेना सोडली होती. कदाचित त्यावेळी मला आजच्या इतकी समज नव्हती. त्यामुळे गैरसमज वाढत गेले. पण, आता मी माझ्या घरात परतलो आहे. जे काही गैरसमज होते ते दूर झाले आहेत.’ शिवसेना सोडताना मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करून तुम्ही शिवसेना सोडली होती. आता त्यांच्याविषयीचा गैरसमज दूर झाला का? असा प्रश्न भास्कर जाधव यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर जाधव म्हणाले, ‘मी २००४मध्ये शिवसेना सोडली. त्यावेळी मी नार्वेकरांवर नाराजी व्यक्त केल्याचा एक तरी पुरावा द्वावा, असे आव्हान मी तुम्हा पत्रकारांना देतो. मी कधीच नार्वेकरांमुळे शिवसेना सोडली, असे म्हणालेलो नाही.’ जाधव म्हणाले, ‘मी मूळचा शिवसैनिक आहे. शिवसेना सोडल्यानंतर इतक्या वर्षांत मला माझा निर्णय स्वस्थ बसू देत नव्हता. मला अंतरआत्मा स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळेच मी शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला.’

मुंबई-औरंगाबाद-मुंबई
दरम्यान, भास्कर जाधव  यांनी सकाळी खासगी विमानाने औरंगाबाद गाठत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला.  भास्कर जाधव शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्यासह यांनी विशेष विमानेने औरंगाबादेत आले होते. माजी खासदार चंद्रकांत खैरे, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थित कुंभेफळजवळ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज भास्कर जाधव यांना अधिक वेळ लागू नये म्हणून विशेष काळजी घेतली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे एका कार्यक्रमाला जाणार होते. तत्पूर्वीच जालना रोडवरील कुंभेफळमध्ये एका ठिकाणी भास्कर जाधव येऊन थांबले होते. हरिभाऊ बागडे यांना उशीर झाला होता. मात्र हरिभाऊ बागडे यांनी थेट मोटरसायकलवर बसूनच भास्कर जाधव जिथे वाट पाहत थांबले होते तिथे ते पोहोचले. राजीनामा दिल्यानंतर भास्कर जाधव, नार्वेकर, परब यांच्यासमवेत विशेष विमानाने पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com