सावधान! महिलांनो, साडी पडेल लाखात भारी

विक्रम गायकवाड
Wednesday, 12 August 2020

सध्याच्या काळात ऑनलाईन खरेदीला अनेक जण प्राधान्य देतात. घरबसल्या घरपोच सेवा मिळत असल्याने वेळेची बचत तर होतेच. शिवाय, ऑनलाईन खरेदीवर सूटसुद्धा मिळत असते. याला अनेक महिला मात्र भूलतात आणि भामट्यांच्या तावडीत सापडतात. अशाच एका संकेतस्थळावरून एका महिलेने ऑनलाईन एक हजारच्या दोन साड्यांची खरेदी केली. मात्र, त्‍यानंतर तिच्या खात्यातून एक लाख रुपये वळते करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

नवी मुंबई : ऑनलाईन साड्या मागवणे सीवूड्‌स भागात राहणाऱ्या एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने ऑनलाईन दोन साड्या खरेदी केल्या होत्या. मात्र, त्या खराब निघाल्याने संबंधित संकेतस्थळावरील भामट्यांनी रक्कम परत करण्याचे आश्वासन देत महिलेच्या डेबिट कार्डची संपूर्ण माहिती घेतली. त्याआधारे त्यांनी तब्बल 1 लाख 9 हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील भामट्यांविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. 

धक्कादायक : मित्रांसोबत फिरायला गेला अन् गाडीत मृतदेह

महावितरण कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेली 39 वर्षीय महिला सीवूड्‌समध्ये राहण्यास आहे. एका संकेतस्थळावरून या महिलेने 12 जुलै रोजी 1198 रुपयांच्या दोन साड्या खरेदी केल्या. या साड्या त्यांना जवळपास एक महिन्याने 8 ऑगस्ट रोजी घरपोच मिळाल्या; परंतु दोन्ही साड्या खराब निघाल्याने त्यांनी त्‍या परत करण्याचे ठरवले. यासाठी संबंधित संकेतस्थळाच्या कस्टमर केअर दूरध्वनीवर संपर्क साधत त्याबाबतची माहिती दिली. त्या वेळी समोरील व्यक्तीने पैसे परत पाठवत असल्याचे सांगून महिलेला क्विक सपोर्ट हे ऍप मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगितले. 

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईतील खासगी रुग्णांच्या लुटमारीला महापालिकेचा चाप

त्यानंतर त्यात कनेक्‍ट टू पार्टनरमध्ये डेबिट कार्डचा नंबर टाकण्यास सांगितले. त्यानुसार माहिती भरताच सुरुवातील त्यांच्या खात्यातून 9 हजार 099 रुपये, त्‍यानंतर 9 हजार 999 असे 10 वेळा एकूण 1 लाख 9 हजार 899 रुपये परस्पर काढून घेतले. याबाबतचे संदेश मोबाईलवर येताच आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे त्‍यांनी एनआरआय पोलिस ठाणे गाठून या संदर्भात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman lost her 1 lac rupees during online shopping