नवी मुंबईतील खासगी रुग्णांच्या लुटमारीला महापालिकेचा चाप; आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

सुजित गायकवाड
Wednesday, 12 August 2020

नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महापालिकेने केलेली व्यवस्था कमी पडत असल्याने खासगी रुग्णालयांचीही मदत घेतली जात आहे. परंतु काही खासगी रुग्णालयांकडून गैरफायदा घेतला जात आहे.

नवी मुंबई : कोरोनाच्या काळात गरीब रुग्णांची लुटमार करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी चाप लावला आहे. महामारीच्या काळात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने आखून दिलेल्या नियमांचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. खासगी रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेची माहिती, दरपत्रक, रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आकारणे, आदी तक्रारी प्राप्त झाल्यास कारवाई करू, असे संकेत बांगर यांनी दिले आहेत.

IPL खेळण्याचं स्वप्न अधूरं! मुंबईकर क्रिकेटपटूनं संपवलं जीवन

नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महापालिकेने केलेली व्यवस्था कमी पडत असल्याने खासगी रुग्णालयांचीही मदत घेतली जात आहे. परंतु काही खासगी रुग्णालयांकडून गैरफायदा घेतला जात आहे. रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिल आकारणे, बिल देईपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णाचे शव न देणे, दरपत्रक व खाटांच्या उपलब्धतेची माहिती जाहीर न करणे आदी तक्रारी महापालिकेला प्राप्त होत आहेत. 

मुंबई पालिकेच्या 'या' रुग्णालयात लवकरच सुरु होणार पोस्ट कोविड OPD

त्यामुळे महापालिकेतर्फे शहरातील सर्व खासगी व धर्मदाय रुग्णालयांना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटीशीअन्वये बांगर यांनी सर्व रुग्णालयांना तीव्र कारवाई करण्याचे संकेत दिल्यामुळे रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत. 

BIG NEWS -  कोरोना चाचणीचे दर झालेत कमी, चाचणी झाली स्वस्त, जाणून घ्या नवीन दर...

काय आहेत आदेश 

  • महापालिकेने अधिग्रहित केलेले प्रत्येक कोव्हिड रुग्णालय महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत असेल.
  • सर्व रुग्णालयांनी रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट सुरू कराव्यात. कमतरता भासल्यास पालिकेकडून किट्स उपलब्ध केल्या जातील. परंतु त्याचे रुग्णांकडून पैसे आकारू नयेत.
  • प्रत्येक रुग्णालयातील 80 टक्के खाटा महापालिकेतर्फे नियंत्रित केल्या जातील. 
  • खाटांचे दर सरकारने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक असू नयेत. तसेच दरपत्रक दर्शनी भागात ठळक अक्षरात प्रदर्शित करावेत.
  • सर्व रुग्णालयांनी रोजच्या उपलब्ध खाटांपैकी रिक्त आणि भरलेल्या खाटांची माहिती दैनंदिन महापालिकेकडे द्यावी.
  • रुग्णाला प्रवेश देते वेळी त्याच्याकडून अनामत रक्कमेची मागणी करू नये.
  • पैसे नसल्याच्या कारणावरून रुग्णाला उपचारांपासून वंचित ठेवू नये.
  • कोणत्याच रुग्णाला प्रवेश देण्यास नाकारू नये, अगदी खाट उपलब्ध नसेल तर त्याला विलगीकरण कक्षात ठेवून दुसऱ्या ठिकाणी खाट   उपलब्ध होईपर्यंत उपचार करावेत.
  • मेडीकल इम्प्लान्ट, गाईडर, वायर कॅथरेट, पीपीई किट्स आदी वस्तूंचे दर हाफकिन सारख्या मान्यता प्राप्त संस्थेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक असू नयेत.

-----------
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMMC warns private hospital over bills charged by private hospital