कांद्याचा मुंबई अन सातारामध्ये 13 हजाराचा भाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

नाशिक ः सोलापूरमध्ये 5 डिसेंबरला कांद्याला क्विंटलला वीस हजाराचा भाव निघाला होता. काल (ता. 7) सतरा हजार, तर आज दहा हजार रुपये क्विंटल भावाने शेतकऱ्यांना इथे कांदा विकावा लागला.

नाशिक ः सोलापूरमध्ये 5 डिसेंबरला कांद्याला क्विंटलला वीस हजाराचा भाव निघाला होता. काल (ता. 7) सतरा हजार, तर आज दहा हजार रुपये क्विंटल भावाने शेतकऱ्यांना इथे कांदा विकावा लागला.

मात्र सातारा, मुंबईमध्ये तेरा हजार, पुण्यात साडेतेरा हजार अन्‌ राहतामध्ये 11 हजार 500 रुपये क्विंटल असा कांद्याचा आज भाव राहिला. 
बेंगळुरुमध्ये स्थानिक कांद्याचा क्विंटलचा भाव 11 हजार रुपये निघाला असताना महाराष्ट्रातील कांद्याला 13 हजार रुपये मिळालेत. चेन्नईमध्ये क्विंटलभर कांद्याचा भाव 16 हजार रुपये असा राहिला. दरम्यान, कांद्याचे आगार असलेल्या लासलगावमध्ये क्विंटलमागे तेराशे रुपयांनी कांद्याच्या भावात घसरण झालेला असताना मुंगसेमध्ये 1 हजार, धुळ्यात 2 हजार, नाशिकमध्ये 1 हजार 751, येवल्यात 400, तर मनमाडमध्ये 400 रुपयांनी क्विंटलचे भाव कमी झाले आहेत. दुसरीकडे मात्र कोल्हापूरमध्ये क्विंटलभर कांद्याचा भाव पंधरा हजार रुपयांवर दोन दिवस स्थीर राहिला. 

कष्टकऱ्यांच्या वस्तीत कांदा गायब 
नवीन कांद्याची आवक सुरु होत असताना इतर राज्यातून कांदा बाजारात दाखल होण्यास सुरवात झाली असली, तरीही मागणीच्या तुलनेत कांदा विक्रीसाठी येत नसल्याने भाव कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. कष्टकऱ्यांची वस्ती असलेल्या शहरातील सातपूर-सिडको भागातील अनेक बाजारातून कांदा गायब झाला आहे. दीडशे ते एकशे ऐंशी रुपये किलो भावाने ग्राहक कांदा विकत घेत नाहीत. त्यातच, अधिक दिवस कांदा टिकाव धरत नसल्याने नुकसान कशाला करुन घ्यायचे म्हणून कांदा विक्रीसाठी ठेवत नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik-Onion-Rate