Vidhan Sabha 2019 : आदित्य यांचा ‘विजय संकल्प’

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

मला शिवसेनेच्या ‘स्टाईल’ने काम करायचे आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,’ असे सांगत आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

विधानसभा 2019
मुंबई - ‘मला शिवसेनेच्या ‘स्टाईल’ने काम करायचे आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,’ असे सांगत आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या ६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरला.

‘मी निवडणूक लढवणार’, असे थेट सांगत स्वतः आदित्य ठाकरे यांनीच वरळीतील ‘विजय संकल्प’ मेळाव्यात आपल्या नावाची घोषणा केली. या वेळी आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्‍मी ठाकरे, भाऊ तेजस ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरे मात्र या वेळी उपस्थित नव्हते. ‘‘माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री बनण्यासाठी निर्णय घेतलेला नाही, मला महाराष्ट्रचे भले करायचो आहे. सर्व भेदभाव दूर करून महाराष्ट्र एक करायचा आहे, नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,’’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

‘‘हीच ती वेळ आहे नवा महाराष्ट्र घडवायची, यामुळे शिवसैनिकांच्या आग्रहाखातर मी निवडणुकीच्या राजकारणात उतरलो. माझ्या परीक्षेबाबत अनेक दिवस तर्कवितर्क सुरू होते. किशोरी पेडणेकरांनी पेपर फोडला; पण आपल्या सरकारमध्ये कुणी पेपर फोडू शकत नाही. मी जनतेचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा केली. जनआशीर्वाद यात्रेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी मी लोकांच्या मनातील भावना ओळखण्याचा प्रयत्न केला आणि हा निर्णय घेतला,’’ असे आदित्य म्हणाले. 

छावा राजकारणात - राऊत
‘‘आपले मंगळयान जरी मंगळावर उतरले नसले तरी हे सूर्ययान २१ तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही,’’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचा छावा आता राजकारणात उतरला आहे. आजपर्यंत ठाकरे कुटुंबीय निवडणूक लढले नव्हते. मात्र, इतिहास घडवताना नियम बाजूला ठेवायचे असतात असेही राऊत म्हणाले. ‘‘आजचा हा माहौल बघून ट्रम्पदेखील आदित्य यांच्या प्रचाराला येतील. महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर आदित्य यांच्याशिवाय पर्याय नाही. आजचा प्रवेश हा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,’’ असे राऊत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray will contest from Worli