राज्य सरकार खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठिशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

 • अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा तपशीलवार आढावा
 • मंत्रिमंडळ उपसमितीची आज होणार बैठक*

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. 

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनााच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (शनिवारी) बैठक बोलाविण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

बैठकीस मुख्य सचिव अयोज मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाव विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषि व पदूम विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, यांच्यासह विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विविध विमा कंपन्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते. 

यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अत्यंत तपशीलवाररित्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीचे स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रे सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

काय म्हणालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :

 1. यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह चार वादळांचा फटका बसला.
 2. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती.
 3. प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकर्‍याची समस्या ऐकून घ्यावी.
 4. दुष्काळाच्या काळात उभारली, तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअ‍ॅप क्रमांक सुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत.
 5. शासनाचे या संपूर्णपणे स्थितीवर लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे.
 6. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यामुळे बाधित झाली आहेत.
 7. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
 8. व्हिडीओकॅान्फरन्सींगद्वारे घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार आणि प्राथमिक माहितीनुसार राज्यात सुमारे 325 तालुक्यांमधील 54 लाख 22  हजार हेक्टरवरील पीकं बाधित झाली आहेत. 

नुकसानाची विभागनिहाय माहिती :

 1. कोकण - (46 तालुके/97 हजार हेक्टर)
 2. नाशिक - (52 तालुके/16 लाख हेक्टर)
 3. पुणे - (51 तालुके/1.36 लाख हेक्टरहून अधिक)
 4. औरंगाबाद - (72 तालुके/22 लाख हेक्टर)
 5. अमरावती - (56 तालुके/12 लाख हेक्टर)
 6.  नागपूर - (48 तालुके/40 हजार हेक्टर).

साधारणत: 53 हजार हेक्टरवर फळपिकं, 1 लाख 44 हजार हेक्टरवर भात, 2 लाख हेक्टरवर ज्वारी, 2 लाख हेक्टरवर बाजरी, 5 लाख हेक्टरवर मका, 19 लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे तितक्याच हेक्टरवर 19 लाख हेक्टरवरील कापूस पीकाचे नुकसान झाले आहे.

WebTitle:  detail report on devendra fadanvis press conference on un seasonal rain and relief to farmers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: detail report on devendra fadanvis press conference on un seasonal rain and relief to farmers